Join us

सोन्या-चांदीचे भाव उसळले

By admin | Updated: October 8, 2014 03:10 IST

मंगळवारी सोन्या-चांदीचे भाव वर चढले. राजधानी दिल्लीत सोने तोळ्यामागे २१0 रुपयांनी, तर चांदी किलोमागे ९६0 रुपयांनी वाढली.

नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांचा लाभ मिळाल्याने मंगळवारी सोन्या-चांदीचे भाव वर चढले. राजधानी दिल्लीत सोने तोळ्यामागे २१0 रुपयांनी, तर चांदी किलोमागे ९६0 रुपयांनी वाढली.या दरवाढीनंतर दिल्लीत सोने २७,२८0 रुपये तोळा, तर चांदी ३९,२५0 रुपये किलो झाली आहे. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, सणासुदीचे दिवस असल्याने बाजारात ग्राहकी वाढली आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी स्टॉकिस्टांनी मोठी खरेदी केली. त्याचप्रमाणे ज्वेलरांनीही खरेदीचा धडाका सुरू केला. या दोन्हींचा परिणाम होऊन सोन्या-चांदीचे भाव वाढले. दिवाळीमध्ये देवदेवतांच्या प्रतिमा असलेल्या चांदीच्या शिक्क्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी शिक्के निर्मात्यांकडून चांदीची खरेदी सुरू आहे. त्यामुळे चांदीच्या भावाला तेजी मिळाली. शेअर बाजारातील गुंतवणूक सोन्याकडे वळविण्यात येत असल्यानेही सराफा बाजारातील तेजीला हातभार लागला असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. जागतिक बाजारातील मंदीला आज ब्रेक लागला. सिंगापूरच्या सोने बाजारात काल १५ महिन्यांचा नीचांक झाला होता. आज तेथील भाव वधारले. सोने 0.४ टक्क्यांनी वाढून प्रतिऔंस १,२0३.0२ डॉलर झाले, तर चांदीचा भाव 0.३ टक्क्यांनी वाढून प्रतिऔंस १७.३९ डॉलर झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)