नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर संकेत आणि आभूषण विक्रेत्यांची घटती मागणी यामुळे राजधानी दिल्लीच्या सराफ्यात गुरुवारी सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे. आज सोन्याचा भाव २५ रुपयांच्या घसरणीसह २७,३२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीचा भावही २६० रुपयांनी घटून ३८,५४० रुपये प्रतिकिलोवर राहिला.बाजार सूत्रांच्या मते, परदेशी बाजारातील घसरणीमुळे स्थानिक बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम नोंदला गेला. अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर डॉलर बळकट झाल्याने पर्यायी गुंतवणुकीच्या रूपाने मौल्यवान धातूंची मागणी घटली. परिणामी सोन्याचा भाव दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. जागतिक बाजारात सिंगापूर येथे सोन्याचा भाव किरकोळ घसरणीसह १,१८७.३६ डॉलर प्रतिऔंस झाला. बुधवारी १,१८८.०९ डॉलर एवढा होता. चांदीचा भावही ०.२ टक्क्यांनी घटून १६.६७ डॉलर प्रतिऔंस राहिला. लग्नसराईचा हंगाम संपल्याने आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्यानेही मौल्यवान धातूंच्या भावावर दबाव राहिला.तयार चांदीचा भाव २६० रुपयांनी कमी होऊन ३८,५४० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही २८० रुपयांच्या घसरणीसह ३८,२९५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला. तथापि, चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरिता ५६,००० रुपये आणि विक्रीसाठी ५७,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क) ४राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २५ रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे २७,३२५ रुपये आणि २७,१७५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. गेल्या दोन दिवसांत यात १२५ रुपयांची घट झाली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही १०० रुपयांच्या घसरणीसह २३,७०० रुपयांवर बंद झाला.
सलग तिसऱ्या दिवशी झाली सोन्या-चांदीच्या भावात घट
By admin | Updated: May 28, 2015 23:44 IST