नवी दिल्ली : ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचा बाजार मंदीत आला आहे. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोने ५0 रुपयांनी उतरले, तर चांदी तब्बल ६६५ रुपयांनी उतरली. या घसरणीनंतर सोन्याचा भाव २७,८00 रुपये तोळा झाला, तर चांदीचा भाव ३८,२३५ रुपये किलो झाला. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, दिवाळीतील या घसरणीला जागतिक बाजारातील मंदी आणि औद्योगिक क्षेत्राकडून असलेल्या मागणीत झालेली घट प्रामुख्याने कारणीभूत आहे. चीन आणि युरोपमधील अर्थव्यवस्था नरमाईचा कल दाखवीत असल्यामुळे सोन्या-चांदीच्या बाजारावर परिणाम झाला आहे. दोन्ही धातूंच्या मागणीत घट झाली आहे. दिवाळीच्या दिवशी विक्रम संवत २0७१ ला सुरुवात झाली आहे. पारंपरिक मुहूर्ताच्या खरेदीचा फारसा उत्साह बाजारात दिसून आला नाही. ९९.९ टक्के शुद्धता आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव गुरुवारी प्रत्येकी ५0 रुपयांनी कोसळून अनुक्रमे २७,८00 रुपये तोळा, तसेच २७,६00 रुपये तोळा झाला. सोन्याच्या ८ ग्राम गिन्नीचा भाव २४,३00 रुपये झाला. जागतिक बाजारात सोने कमजोर झाले आहे. लंडनच्या बाजारात सोने 0.२0 टक्क्यांनी उतरून प्रति औंस १,२३९.१६ डॉलर झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्या-चांदीच्या भावात आणखी घसरण!
By admin | Updated: October 24, 2014 03:45 IST