Join us

ऐन दिवाळीत सोने-चांदी उतरले

By admin | Updated: October 23, 2014 04:56 IST

बाजारातील सूत्रांनी सांगितले की, सणासुदीचा हंगाम शिखरावर असल्यामुळे गेल्या काही दिवसांतील तेजीमुळे सोन्या-चांदीचा भाव सहा आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील नरमाई, दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्याकडून असलेल्या मागणीतील घट, तसेच औद्योगिक क्षेत्राने खरेदीकडे फिरविलेली पाठ यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मंदीची चाल दिसून आली. सोने ७५ रुपयांनी उतरून २७,८५0 रुपये तोळा, तर चांदी १00 रुपयांनी उतरून ३८,९00 रुपये किलो झाली.बाजारातील सूत्रांनी सांगितले की, सणासुदीचा हंगाम शिखरावर असल्यामुळे गेल्या काही दिवसांतील तेजीमुळे सोन्या-चांदीचा भाव सहा आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते. त्यामुळे दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीतील हात आखडता घेतला. त्याचा बाजारातील धारणेवर परिणाम झाला. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती त्यामुळे उतरल्या.दुसऱ्या बाजूने शेअर बाजारातील तेजीचा फटका सराफा बाजाराला बसला. गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळल्यामुळे सराफा बाजारातील उत्साह कमी झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाही तेजीत असल्यामुळेही सराफा बाजारावर परिणाम झाला आहे.जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात घसरण दिसून आली. लंडन येथील सोने बाजारात सोने 0.२६ टक्क्यांनी उतरले. तेथील सोन्याचा भाव १,२४६.२0 डॉलर प्रति औंस असा राहिला. तयार चांदीच्या भावात १00 रुपयांची घसरण झाली. त्याबरोबर चांदीचा भाव ३८,९00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ४१५ रुपयांनी कोसळून ३८,३00 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६९,000 रुपये शेकडा आणि विक्रीसाठी ७0,000 रुपये शेकडा असा आदल्या दिवशीच्या स्तरावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)