नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात सोमवारी घसरण नोंदली गेली. आज सोन्याचा भाव ३० रुपयांनी घटून २७,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारात तेजीचा कल असतानाही स्थानिक सराफ्यात घसरणीचा कल नोंदला. चांदीचा भावही ३१० रुपयांनी कमी होऊन ३६,९०० रुपये प्रतिकिलो झाला. बाजार विश्लेषकांच्या मते, आभूषण निर्माते आणि किरकोळ व्यापारी यांची मागणी कमी झाल्याने उच्च पातळीवरील सोन्याच्या भावात ही घट नोंदली गेली. तथापि, जागतिक बाजारात तेजीचा कल राहिल्याने स्थानिक सराफ्यातील घसरणीला काहीसा लगाम बसला. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.५ टक्क्यांनी वधारून १,१८४.८२ डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भावही १.१ टक्क्यांनी वाढून १६.३३ डॉलर प्रतिऔंस झाला. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ३० रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे २७,००० रुपये आणि २६,८५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात गेल्या दोन सत्रांत ४४५ रुपयांची घट नोंदली गेली आहे. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,७०० रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव ३१० रुपयांनी घटून ३६,९०० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३६,५४० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव हजार रुपयांनी कोसळून खरेदीकरिता ५५,००० रुपये व विक्रीसाठी ५६,००० रुपये प्रतिशेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्या-चांदीच्या भावात सलग तिसऱ्या व्यावसायिक सत्रात घट
By admin | Updated: May 4, 2015 23:36 IST