नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बुधवारी सोने १० ग्रॅममागे १५०, तर चांदी किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त झाली. जागतिक बाजारातील अनुत्साह आणि दागिने निर्मात्यांकडून कमी झालेल्या मागणीमुळे दिल्लीत सोने स्वस्त होऊन २५,५५० रुपये तोळा आणि चांदी ३४,१५० रुपये किलो झाली. मागणीत घट झाल्यामुळे ही घसरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. औद्योगिक क्षेत्रात आणि नाणी निर्मात्यांकडून चांदीला मागणी नव्हती. सिंगापूरच्या बाजारात सोने औंसला १,०६९ अमेरिकन डॉलर, तर लंडनमध्ये ते औंसमागे ०.१३ टक्के घटून १,०६७.४० अमेरिकन डॉलरवर आले. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव १० ग्रॅममागे १५० रुपयांनी खाली येऊन अनुक्रमे २५,५५० व २५,४०० रुपये झाला. मंगळवारी सोने १७५ रुपयांनी वधारले होते. आठ ग्रॅमच्या सोन्याचा भाव मर्यादित व्यवहारात २२,२०० असा स्थिर होता. दिल्लीच्या सराफा बाजारात तयार चांदीचा भाव किलोमागे १५० ने खाली येऊन ३४,१५० आणि वीकली बेस्ड् डिलिव्हरीची चांदी ९० रुपयांनी स्वस्त होऊन ३३,५७५ रुपये झाली. (वृत्तसंस्था)
मागणी कमी झाल्याने सोने-चांदी उतरले
By admin | Updated: December 3, 2015 02:12 IST