Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वावलंबन’मध्ये यंदाचे लक्ष्य ८० लाख लाभार्थी

By admin | Updated: September 22, 2014 23:15 IST

पंतप्रधान जन-धन योजनेचा भाग असलेल्या स्वावलंबन पेन्शन योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात सुमारे ८० लाख लाभार्थी सामील करण्याचे लक्ष्य निर्धारित केले

नवी दिल्ली : सरकारने वित्तीय समावेशनाची महत्त्वकांक्षी योजना पंतप्रधान जन-धन योजनेचा भाग असलेल्या स्वावलंबन पेन्शन योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात सुमारे ८० लाख लाभार्थी सामील करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. पेन्शन कोष नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात पीएफआरडीएच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली.प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. व्ही. वर्मा यांनी सांगितले की, जन-धन योजनेचा हा एक अविभाज्य भाग आहे. स्वावलंबनचा त्यात समावेश आहे. स्वावलंबन योजनेंतर्गत आमच्या लाभार्थ्यांची संख्या सुमारे ३० लाख आहे. चालू आर्थिक वर्षअखेरीपर्यंत ८० लाख लाभार्थ्यांना यामध्ये सहभागी करून घेण्याचे लक्ष्य आहे.बँकांनी वास्तविक पाहता समाजाच्या खालच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. बँकिंग उत्पादने स्वस्त व कमीत कमी खर्चात उपलब्ध करून दिली जावीत, अशी अपेक्षा वर्मा यांनी व्यक्त केली. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी माहिती- तंत्रज्ञान प्रक्रियेचा अवलंब करावा. पेन्शन योजनेंतर्गत लोकसंख्येच्या सर्वांत खालच्या वर्गाला सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. जनतेला मोठ्या संख्येने यात सहभागी करून घेण्यासाठी बँकिंग उद्योग पेन्शन प्राधिकरण व वित्त मंत्रालयासोबत काम करीत आहेत. वर्मा हे राजधानीत आयोजित एका परिषदेत बोलत होते.समाजातील एका मोठ्या वर्गाला याचा लाभ होण्यासाठी वित्तीय क्षेत्राची पोहोच वाढवण्याची गरज आहे. जन-धन योजनेंतर्गत येणाऱ्या योजना जनतेत पोहोचणे आवश्यक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)