Join us

जागतिक सुधारणांचा सर्वांनी लाभ घ्या, रोजगारासाठी प्रयत्न हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 04:20 IST

जागतिक अर्थव्यवस्थेतील बहुप्रतीक्षित सुधारणा मूळ धरीत आहे. तिचा फायदा घेऊन सर्वांसाठी काम करणारी अर्थव्यवस्था निर्माण करावी, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख ख्रिस्टिनी लगार्ड

वॉशिंग्टन : जागतिक अर्थव्यवस्थेतील बहुप्रतीक्षित सुधारणा मूळ धरीत आहे. तिचा फायदा घेऊन सर्वांसाठी काम करणारी अर्थव्यवस्था निर्माण करावी, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख ख्रिस्टिनी लगार्ड यांनी आंतरराष्ट्रीय समुदायास केले.लगार्ड म्हणाल्या की, अर्थव्यवस्था सशक्त असेल, तर सुधारणा राबविणे अधिक सोपे होते, असा आयएमएफच्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. जगाची अर्थव्यवस्था मजबुतीचे मूळ धरू लागली आहे. याचा फायदा घेऊन जागतिक समुदायाने उत्पन्न वाढविणे, नवे रोजगार निर्माण करणे, लोकांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करणे आणि समावेशक वृद्धी गाठणे यासाठी प्रयत्न करायला हवेत.

हॉर्वर्ड विद्यापीठात लगार्ड यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्यांनी म्हटले की, महिलांचे सबलीकरण करणे ही खरे तर आर्थिक क्षेत्रातील बिलकूल सोपी बाब आहे. तथापि, त्याकडे लक्ष दिले जात नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही श्रमशक्तीमध्ये दाखल झाल्या, तर अमेरिकेचा जीडीपी ५ टक्क्यांनी, भारताचा २७ टक्क्यांनी व इजिप्तचा जीडीपी ३४ टक्क्यांनी वाढेल. केवळ उदाहरणादाखल ही तीन देशांची नावे मी घेतली आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची वार्षिक सर्वसाधारण सभा आठवडाभरावर आली असताना लगार्ड यांनी हे वक्तव्य केले आहे. भारताच्या वतीने वित्तमंत्री अरुण जेटली या सभेला उपस्थित राहणार आहेत.