Join us

जागतिक घडामोडींचा भारतावरही परिणाम

By admin | Updated: February 13, 2016 03:40 IST

जागतिक पातळीवरील आर्थिक घडामोडींचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे, असे निरीक्षण बँक आॅफ अमेरिका-मेरिल लिंचने (बोफा-एमएल) नोंदविले आहे.

नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील आर्थिक घडामोडींचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे, असे निरीक्षण बँक आॅफ अमेरिका-मेरिल लिंचने (बोफा-एमएल) नोंदविले आहे. भारतीय शेअर बाजारांतील घसरण याचेच द्योतक आहे. असे असले तरी येणाऱ्या अर्थसंकल्पात यावर काही उपाययोजना होण्याची शक्यता कमीच आहे, असेही बोफा-एमएलने म्हटले आहे.गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८0७ अंकांनी घसरून २३ हजार अंकांच्या खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही विक्रमी घसरला आहे. या पार्श्वभूमीवर बोफा-एमएलचे हे निरीक्षण आले आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त होते, असे जाणकारांचे मत आहे.बोफाने म्हटले की, भारतातील कंपन्यांची कमाई कमी झाली आहे. अर्थसंकल्पातून काही प्रोत्साहक बाहेर आले तर अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल. तथापि, २0१६ चा अर्थसंकल्प बाजारासाठी फार काही प्रोत्साहक असेल असे वाटत नाही. भारत सरकार मात्र भारतीय अर्थव्यवस्थेला धोका नसल्याचे ठासून सांगताना दिसत आहे. जगाची अर्थव्यवस्था कमजोर स्थितीत असली तरी भारत मजबुतीकडे वाटचाल करीत असल्याची निवेदने काही काळापासून सरकारच्या वतीने जारी केली जात आहेत.