Join us  

पीएनबी घोटाळ्यामुळे रत्न-आभूषण क्षेत्र तब्बल १६ टक्क्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 3:23 AM

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यामुळे नीरव मोदी समूह आणि मेहूल चोकसी समूह यांना टाळे लागणे क्रमप्राप्त असून, या कंपन्यांच्या अनुपस्थितीमुळे भारतीय रत्ने व आभूषण क्षेत्राची उलाढाल तब्बल १६ टक्क्यांनी घटणार आहे.

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यामुळे नीरव मोदी समूह आणि मेहूल चोकसी समूह यांना टाळे लागणे क्रमप्राप्त असून, या कंपन्यांच्या अनुपस्थितीमुळे भारतीय रत्ने व आभूषण क्षेत्राची उलाढाल तब्बल १६ टक्क्यांनी घटणार आहे. हिरे आणि दागिन्यांचा व्यापार ५ ते ६ टक्क्यांनी कमी होईल, तसेच या क्षेत्रातील अनुत्पादक भांडवलाचे (एनपीए) प्रमाण वाढून ३0 टक्के होईल.केअर रेटिंग्ज या संस्थेतील मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबणीस यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, फायरस्टार डायमंडस् या कंपनीचा २0१४-१५ आणि २0१५-१६ मधील महसूल अनुक्रमे १,५८१ कोटी व १,९४५ कोटी रुपये होता. याच काळात गीतांजली जेम्सचा महसूल अनुक्रमे ७,१५७ कोटी व १0,७५0 कोटी रुपये होता. या दोन्ही कंपन्या आता बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील विक्री घटून ६६,२३७ कोटींवर येईल. विक्रीचा आकार अशा प्रकारे १६ टक्क्यांनी कमी होईल.पीएनबी घोटाळ्यामुळे रोजगारावरही परिणाम होणार आहे. मार्च २0१७ च्या फायलिंगनुसार, गीतांजली जेम्स आणि नीरव मोदी या दोन्ही कंपन्यांमध्ये अनुक्रमे ६४८ आणि २,२00 कर्मचारी काम करतात. दोन्ही कंपन्यांचे मिळून सुमारे ३ हजार लोक बेरोजगार होतील. या कंपन्यांकडे देशातील सर्वांत मोठे किरकोळ विक्रीचे जाळे आहे. त्यांच्या फ्रँचाईजींकडे काम करणारे सुमारे ७ ते ८ हजार कामगार व कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. रत्ने व आभूषण क्षेत्रात २२ हजार लोक काम करतात. त्यातील १२ ते १५ टक्के लोक वरील दोन कंपन्यांत कामाला आहेत. या आकडेवारीत कारागीर आणि हंगामी कर्मचारी यांचा समावेश नाही.डिसेंबर २0१७ च्या आकडेवारीनुसार, रत्ने व आभूषण क्षेत्राला बँकांनी ६९ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिलेले आहे. बँकांच्या एकूण ७३ लाख कोटी कर्जाच्या तुलनेत हे कर्ज सुमारे १ टक्का आहे. यातील १६ ते १७ हजार कोटी रुपयांचे कर्ज मोदी-चोकसी यांच्या दोन कंपन्यांकडे आहे. विशेष म्हणजे हमीपत्रांच्या (एलओयू) आधारे घेण्यात आलेल्या १३,000 कोटींच्या कर्जाचा यात समावेश नाही. ही सगळी कर्जे आता संकटात आहेत. सप्टेंबर २0१७ च्या आकडेवारीनुसार या क्षेत्राचे अनुत्पादक भांडवलाचे प्रमाण (एनपीए) ३0 टक्के होईल.>नीरवचे हिरेजडित दागिने पीएनबीच्या ताब्यातप्रवर्तन निदेशालयाने नीरव मोदीची ६३०० कोटीची संपत्ती जप्त केली आहे. यात ५१०० कोटीचे हिरेजडित दागिने, सोने, प्लॅटिनम व जवाहिर आहे. सध्या प्रवर्तन निदेशालयाने हे दागिने व जवाहिर पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी सुरक्षित ठेवण्यासाठी दिले आहेत.केंद्र सरकारची मिनरल्स अ‍ॅन्ड मेटल ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एमएमटीसी) ही कंपनी या सर्व दागिन्यांची व सोन्याची मोजदाद करून किंमत निश्चित करेल आणि ही किंमत सरकारी किंमत म्हणून या दागिन्यांच्या लिलावासाठी वापरली जाईल, अशी माहिती ईडीच्या उच्चपदस्थ सूत्राने दिली.

टॅग्स :सोनं