मुंबई : भारतातील शेअर बाजारात मंगळवारी पुन्हा एकदा मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५८७ अंकांनी घसरून २५,६९६.४४ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा एक वर्षाचा नीचांक ठरला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८५.४५ अंकांनी घसरून ७,८00 अंकांच्या पातळीच्या खाली आला आहे.भारताच्या जीडीपीच्या वाढीचा दर ७.५ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आल्याची आकडेवारी सरकारने काल जाहीर केली होती. याच बरोबर चीनचे कारखाना उत्पादन ४९.७ टक्क्यांवर आले आहे. हा तीन वर्षांचा नीचांक ठरला आहे. आॅगस्ट २0१२ नंतरची सर्वाधिक नीचांकी पातळी आहे. याचा परिणाम भारतासह जगभरातील बाजारांवर झाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८५.४५ अंकांनी अथवा २.३३ टक्क्यांनी घसरून ७,७८५.८५ अंकांवर बंद झाला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६ हजार अंकांच्या खाली घसरून २५,६९६.४४ अंकांवर बंद झाला. ५८६.६५ अंकांची अथवा २.२३ टक्क्यांची घसरण त्यानेनोंदविली. बीएसई आणि एनएसई हे दोन्ही शेअर बाजार आॅगस्ट २0१४ च्या पातळीवर गेले आहेत. बाजारात विक्रीचा चौफेर मारा झाला. बँकिंग, धातू, जमीन जुमला, भांडवली वस्तू, पीएसयू, वाहन, टिकाऊ ग्राहक वस्तू, तेल आणि वायू, ऊर्जा, एफएमसीजी, आरोग्य आणि आयटी या सर्वच क्षेत्रांत समभागांची विक्री झाली. बीएसई स्मॉलकॅप आणि मीडकॅप अनुक्रमे २.१७ आणि १.९६ टक्के घसरले. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांत पहिली घसरण सुरू झाली. या घसरणीची लागण नंतर सर्व क्षेत्रात झाली.
जीडीपीचा सेन्सेक्सला फटका
By admin | Updated: September 2, 2015 00:10 IST