नवी दिल्ली : श्रीमंतांचे घरगुती गॅस सिलिंडर अर्थात एलपीजीवरील अनुदान बंद करण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतचे सूतोवाच केले. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.जेटली म्हणाले, ‘माझ्यासारख्यांना एलपीजी अनुदान देण्याची गरज आहे का, यावर भारताने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कुणाला अनुदान दिले जावे, याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. आमच्या व्यवस्थेसाठी हे गरजेचे आहे.’सध्या ग्राहकांना वर्षभरात अनुदानित १२ सिलेंडर मिळतात. दिल्लीत एका अनुदानित सिलिंडरचा भाव ४१४ रुपये एवढा आहे. यापेक्षा अधिक सिलिंडर हवे असल्यास संबंधित ग्राहकाला प्रतिसिलिंडर ८८० रुपये द्यावे लागतात.राजकीय नेतृत्व विशेषत: प्रमुख व्यक्तीकडे निर्णय घेण्याची क्षमता असल्यास गुंतागुंतीचे निर्णयही सहज शक्य होतात, असे जेटली म्हणाले. कोळसा खाणवाटपाचा निर्णय असो की, स्पेक्ट्रम वा नैसर्गिक संसाधने आणि गॅस दर याबाबतच्या निर्णयासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नसल्याचा दावा त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
श्रीमंतांचे गॅस अनुदान होणार बंद
By admin | Updated: November 22, 2014 02:52 IST