Join us

पतधोरणामुळे निराशा, घसरणीचा सप्ताह

By admin | Updated: February 9, 2015 00:52 IST

भारतीय रिझर्व्ह बॅँकेने पतधोरणाच्या आढाव्यात सर्व दर कायम राखण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे बाजारात आलेल्या नैराश्याला आंतरराष्ट्रीय घटनांमुळे आलेला

भारतीय रिझर्व्ह बॅँकेने पतधोरणाच्या आढाव्यात सर्व दर कायम राखण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे बाजारात आलेल्या नैराश्याला आंतरराष्ट्रीय घटनांमुळे आलेला जोर आणि दिल्लीच्या निवडणूक निकालांबाबतची अनिश्चितता यामुळे बाजारात गतसप्ताह हा घसरणीचाच राहिला. १२ डिसेंबरपासूनची सर्वाधिक साप्ताहिक घट नोंदवून बाजार बंद झाला.मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक गतसप्ताहात १.६ टक्कयांनी म्हणजेच ४६५.०४ अंशांनी घसरला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक २८७१७.९१ अंशांवर बंद झाला. १२ डिसेंबरपासून बाजारात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १.७ टक्के म्हणजेच १४७.८५ अंशांनी खाली येऊन ८६६१.०५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्येही अनुक्रमे २.३ आणि २.२ टक्कयांनी घट झाली. बाजाराच्या १२ क्षेत्रीय निर्देशांकांपैकी ९ खाली आले.भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यामध्ये सर्वच दर कायम राखण्याची घोषणा केली आहे. चलनवाढ कमी होत असल्यामुळे व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या बाजाराला त्यामुळे धक्का बसला. याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर विक्रीमध्ये होऊन बाजाराला खीळ बसली. त्यातच परकीय वित्तसंस्थांनीही मोठ्या प्रमाणावर विक्रीचे धोरण अनुसल्यामुळे बाजाराची घसरण सुरूच राहिली. याच्या जोडीलाच अन्य नकारात्मक बाबीही आल्या. भारताची औद्योगिक वाढ जानेवारी महिन्यात कमी झाल्याचे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले. या वाढीचे परिमरण असणार परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ५४.५ वरून ५२.९ पर्यंत खाली आला. त्याचप्रमाणे चीनचा पीएमआयही ४९.७ पर्यंत खाली आला. ग्रीसबाबत युरोपियन युनियनने अचानक कडक भूमिका घेतल्यामुळे युरोपात काहीसे गोंधळाचे वातावरण आहे.