नवी दिल्ली : दूरसंचार वाद निपटारा आणि अपिलीय न्यायाधीकरणाने (टीडीसॅट) आज रिलायन्स जिओच्या प्रारंभिक मोफत सेवेला स्थगिती देण्यास नकार दिला. तथापि, ही सेवा पुढे सुरू ठेवण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीशी संबंधित मुद्द्यांचे पुनर्परीक्षण करण्याच्या सूचना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणास (ट्राय) दिल्या आहेत.यासंबंधीचा तपास पूर्ण करून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायाधिकरणाने ट्रायला दिले आहेत. जिओच्या मोफत सेवेला विरोध करणाऱ्या एका अंतरिम याचिकेवर न्यायाधिकरणाने गेल्या आठवड्यात आपला निर्णय राखून ठेवला होता. त्याआधी न्यायाधिकरणाने या मुद्द्यावर सर्व संबंधित पक्षांची बाजू ऐकून घेतली होती. ट्राय, भारती एअरटेल, आयडिया आणि जिओ यांनी आपापली बाजू न्यायाधीकरणासमोर मांडली.एअरटेलने ही अंतरिम याचिका दाखल केली आहे. मोफत सेवा सुरू ठेवण्यासाठी जिओला मिळालेल्या परवानगीला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. परवानगीशी संबंधित सर्व दस्तावेज सादर करण्याचे आदेश ट्रायला द्यावेत, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली होती. ग्राहकांना शून्य दर प्लॅन आणि प्रोत्साहन प्लॅन उपलब्ध करण्यापासून थांबविण्याची विनंतीही करण्यात आली होती. रिलायन्स जिओने गेल्या वर्षी ५ सप्टेंबरला मोफत डाटा आणि व्हॉईस कॉल सेवा सुरू केली होती. डिसेंबरपर्यंत ही सेवा देण्यात आली. त्यानंतर कंपनीने ही सेवा ३१ मार्च २0१७पर्यंत वाढविली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोफत ‘जिओ’ला स्थगिती नाही
By admin | Updated: March 17, 2017 01:19 IST