Join us

निर्देशांकाच्या वाढीचा सलग चौथा सप्ताह

By admin | Updated: March 28, 2016 01:44 IST

आगामी पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची निर्माण झालेली शक्यता, आवाक्यात असलेल्या प्रमुख समभागांच्या किमती, बाजारात खरेदीदारांची असलेली गर्दी

- प्रसाद गो. जोशी आगामी पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची निर्माण झालेली शक्यता, आवाक्यात असलेल्या प्रमुख समभागांच्या किमती, बाजारात खरेदीदारांची असलेली गर्दी आणि भारतीय बाजारातून मिळणाऱ्या भरघोस परताव्यामुळे परकीय वित्तसंस्थांकडून सुरू असलेली खरेदी अशा सकारात्मक वातावरणात शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सलग चौथ्या सप्ताहात वाढीव पातळी गाठली. सुट्यांमुळे अवघे तीन दिवस बाजारामध्ये उलाढाल झाली.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह तसा तेजीवाल्यांचाच राहिला. सप्ताहात दरदिवशी निर्देशांक वाढीव पातळीवर बंद होताना दिसून आला. सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २५३३७.५६ अंशांवर बंद झाला.मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत ३८४.८२ अंश म्हणजेच १.५४ टक्के एवढी वाढ त्यामध्ये झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ११२.१५ अंशांनी म्हणजेच १.४७ टक्के इतका वाढून ७७१६.५० अंशांवर बंद झाला.मिडकॅप आणि स्मॉल कॅप या बाजाराच्या क्षेत्रिय निर्देशांकांमध्येही वाढ झालेली दिसून येते. या दोन्ही निर्देशांकांमधील आस्थापनांच्या समभागांना मोठी मागणी गतसप्ताहात दिसून आली. या दोन्ही निर्देशांकाची घोडदौड वेगाने सुरू आहे.सरकारने मागील सप्ताहात काही बचत योजनांवरील व्याजदरात कपात करून बाजाराला अपेक्षित असलेला व्याजदर कपात होणार असल्याचे संकेत दिले आहेत.पुढील महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर केले जाणार आहेत. या पतधोरणात व्याजदरात कपात होणे अपेक्षित आहे. या अपेक्षेतच सध्या बाजार वाढताना दिसतो आहे. बाजाराच्या अपेक्षेनुसार व्याजदरात कपात झाल्यास तेजीचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाजाराला किमान पाव टक्का तरी व्याजदरात कपात अपेक्षित आहे.आशियातील भांडवल बाजारांपैकी भारतीय शेअर बाजार हा सर्वाधिक वाढ देणारा आणि भरवशाचा बाजार ठरला आहे. त्यामुळे भारताकडील परकीय वित्तसंस्थांचा ओढा वाढलेला दिसून येत आहे. गत सप्ताहात या संस्थांनी ३३६७.९२ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. मार्च महिन्यात परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारात १४५३४.२९ कोटी रुपये ओतले आहेत.भारतीय अर्थव्यवस्था सुधारत असल्याची पुन्हा एकदा ग्वाही मिळाली आहे. डिसेंबरअखेर देशाच्या चालू खात्यावरील तूट ७.१ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली आहे. ही तूट एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या १.३ टक्के एवढी आहे.आधीच्या तिमाहीतही चालू खात्यावरील तूट कमी झाली होती. आगामी सप्ताहात मार्च महिन्यातील सौद्यांची पूर्ती होणार असल्याने त्याचा बाजारावर दबाव येण्याची शक्यता आहे.