Join us
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी विक्रीचा गीअर टॉपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 04:05 IST

नोटाबंदीचे सुरू असलेले अफ्टरशॉक, जीएसटीचा संभ्रम अशा स्थितीत बाजार असतानाही देशांतर्गत खासगी प्रवासी चारचाकी वाहनांनी विक्रीत टॉप गीअर टाकला आहे.

मुंबई : नोटाबंदीचे सुरू असलेले अफ्टरशॉक, जीएसटीचा संभ्रम अशा स्थितीत बाजार असतानाही देशांतर्गत खासगी प्रवासी चारचाकी वाहनांनी विक्रीत टॉप गीअर टाकला आहे. मागील नोव्हेंबरपेक्षा यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात चारचाकींच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.दिवाळीचा महिना हा आॅटोमोबाइल क्षेत्रासाठी सर्वाधिक विक्रीचा असतो. मागील वर्षी दिवाळी नोव्हेंबर २0१६च्या सुरुवातीला होती. मात्र त्यानंतर लगेच नोटाबंदी घोषित झाली. अशा सर्व स्थितीत त्या नोव्हेंबर महिन्यात चारचाकी बाजारातील लोकप्रिय सात कंपन्यांनी २ लाख १८ हजार ३५६ गाड्यांची विक्री केली. त्यानंतर यंदाची दिवाळी आॅक्टोबर महिन्यात होती. यामुळे यंदा आॅक्टोबर महिन्यात त्याच कंपन्यांकडून २ लाख ५३ हजार ५७१ वाहनांचीविक्री झाली. तर त्यानंतर यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात अनपेक्षितपणे चारचाकींच्या विक्रीत आणखी वाढ झाली.नोव्हेंबर २०१७मध्ये ग्राहक बाजारातील सात कंपन्यांनी २ लाख ५३ हजार ८२२ खासगी प्रवासी चारचाकी वाहनांची विक्री केली. ही वाढ यंदाच्या आॅक्टोबरपेक्षा फार नसली तरी नोटाबंदीच्या नोव्हेंबर २०१६पेक्षा अधिक राहिली आहे. टक्क्यांनुसार, सर्वाधिक वाढ फोर्डच्या गाड्यांत दिसून आली. त्यापाठोपाठ मारुती आणि टाटाचा नंबर आहे. बाजार जीएसटीच्या संभ्रमातून हळूहळू बाहेर येत असल्याने ही वाढ झाल्याचे आॅटोमोबाइल उत्पादकांचे म्हणणे आहे.