Join us  

कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात रेलिगेअरचा माजी सीईओ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 6:02 AM

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : २३०० कोटींचे अपहार प्रकरण

नवी दिल्ली : रेलिगेअर एंटरप्रायजेस लि. (आरईएल) कंपनीतील २,३०० कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात कंपनीचे माजी कार्यकारी अधिकारी (सीईओ) कृष्णन सुब्रमण्यन यांना दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. 

रेलिगेअर फिन्व्हेस्ट लि.चे (आरएफएल) एआर मनप्रीतसिंग सुरी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. मालविंदर मोहन सिंग, शिविंदर मोहन सिंग, सुनील गोधवानी आणि व्यवस्थापकीय पदावरील इतर व्यक्तींना त्यात आरोपी करण्यात आले होते. तक्रारीनुसार, आरईएलवर संपूर्ण नियंत्रण असलेल्या या लोकांनी उपकंपनी असलेल्या आरएफएलकडून वित्तीय आधार नसलेल्या कंपन्यांना कर्ज मंजूर करून घेतले होते. नंतर हे कर्ज भरलेच नाही. त्यातून आरएफएलला २,३९७ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. रिझर्व्ह बँक आणि सेबीच्या लेखापरीक्षणात ही बाब नंतर सिद्धही झाली. या घोटाळ्यात मालविंदर आणि शिविंदर यांना आधीच अटक झालेली आहे. आता पुढील कार्यवाही सुरु झाली आहे.

सुब्रमण्यन हे २०१७-१८ या काळात आरईएलचे समूह सीईओ होते. त्यांनी तीन कंपन्यांना ११५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. मंजुरीच्या वेळी ते ‘सुरक्षित कर्ज’ म्हणून दिले गेले होते. नंतर ते ‘असुरक्षित कर्ज’ या श्रेणीत आणण्यात आले. तारण म्हणून दिलेली जमीनही नंतर परस्पर हस्तांतरित करण्यात आली. या प्रकरणात आता सुब्रमण्यन यांना अटक झाली आहे.