Join us

३.६ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक

By admin | Updated: June 24, 2015 23:47 IST

थेट परकीय गुंतवणुकीचा देशातील ओघ वाढतच असून, गेल्या एप्रिलमध्ये झालेली ही गुंतवणूक ३.६ अब्ज डॉलर इतकी होती.

मुंबई : थेट परकीय गुंतवणुकीचा देशातील ओघ वाढतच असून, गेल्या एप्रिलमध्ये झालेली ही गुंतवणूक ३.६ अब्ज डॉलर इतकी होती. आधीच्या वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत यात सुमारे ११२ टक्के म्हणजेच १.९ अब्ज डॉलर इतकी वाढ झाली आहे. या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यात ७१ टक्के वाढ दिसून आली.गुंतवणूक करण्यासाठी योग्य देश ठरेल. अशा दिशेने सरकारने प्रयत्न केले असल्याने चालू आर्थिक वर्षात विदेशी गुंतवणुकीचा ओघ विक्रमी असेल, असा विश्वास डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशनचे सचिव अमिताभ कांत यांनी व्यक्त केला. गेल्या दीड वर्षाचा विचार करता एप्रिलमध्ये झालेली विदेशी गुंतवणूक ही या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी गुंतवणूक ठरली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात ४.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली होती. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यातील गुंतवणुकीपेक्षा ही १०९ टक्क्यांनी जास्त होती.गुंतवणुकीसाठी अधिक अनुकूल वातावरण करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येणार आहेत, त्यामुळे हा ओघ वाढतच राहणार आहे, असेही कांत यांनी सांगितले. मेक इन इंडिया धोरणाचा अनुकूल परिणाम दिसून येत असून, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात १.०६ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. या क्षेत्रात गुंतवणुकीत झालेली वाढ १४३ टक्के होती. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंडस्ट्रीनंतर दुसऱ्या क्रमांकावर झालेली गुंतवणूक वाहन उद्योगात होती. एप्रिलमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या देशात सिंगापूरचा प्रथम क्रमांक असून, त्यानंतर मॉरिशस, युनायटेड स्टेटस, नेदरलँड आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. या देशांची एकत्रित गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या ८५ टक्के इतकी होती. या गुतंवणुकीतील सुमारे ९० टक्के गुंतवणूक ही मुंबई, बंगळुरू, नवी दिल्ली, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरात झाली आहे.