Join us

परकीय खरेदीने बाजारात उत्साह

By admin | Updated: March 13, 2017 00:30 IST

परकीय वित्तसंस्थांची जोरदार खरेदी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे वधारलेले मूल्य, आंतरराष्ट्रीय बाजारातील आशादायक वातावरण यामुळे शेअर बाजारात गतसप्ताहात उत्साह दिसून आला

शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशीपरकीय वित्तसंस्थांची जोरदार खरेदी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे वधारलेले मूल्य, आंतरराष्ट्रीय बाजारातील आशादायक वातावरण यामुळे शेअर बाजारात गतसप्ताहात उत्साह दिसून आला. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आणि अमेरिकेतील रोजगारविषयक अहवाल यांच्या पार्श्वभूमीवर सप्ताहाच्या उत्तरार्धात सावधगिरीची भूमिका घेतली गेल्याने बाजार काहीसा नरमला असला तरी सप्ताहाचा विचार करता त्यामध्ये वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजारात गत सप्ताह वाढीचाच राहिला. बाजारात झालेल्या पाच दिवसांच्या व्यवहारांपैकी चार दिवस निर्देशांक वर गेला. मात्र एक दिवस झालेली मोठी घसरण बाजाराची सर्व वाढ घेऊन गेल्याने सप्ताहाच्या शेवटी अल्पशी वाढ दिसून आली. सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ११३.७८ अंश म्हणजेच ०.३९ टक्क्यांनी वाढून २८,९४६.२३ अंशावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ३७ अशांनी वाढून ८९३४.५५ अंशावर बंद झाला. सप्ताहाच्या अखेरीस बाजारात सावध हालचाली झाल्याने वाढ कमी राहिली. सप्ताहात परकीय पोर्टफोलिओ संस्थांनी ८६६७.४५ कोटी रुपयांची आणि परकीय वित्त संस्थांनी ५९५७.४० कोटी रुपयांची खरेदी केली, तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी ३२९३.७६ कोटी रुपयांचे समभाग विकून नफा कमविणे श्रेयस्कर मानले. सप्ताहात भारतीय चलन रुपयांच्या मूल्यात २० पैशांनी वाढून डॉलरच्या तुलनेत ६६.६१ रुपये असे स्थिरावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या चालू अधिवेशनात जीएसटी विधेयक मार्गी लागण्याचा व्यक्त केलेला आशावादही बाजाराला दिलासा देणारा ठरला. पाच राजांच्या निवडणूक निकालाबाबत असलेली साशंकता आणि अमेरिकेतील रोजगारविषयक जाहीर व्हावयाची आकडेवारी या पार्श्वभूमीवर सप्ताहाच्या उत्तरार्धात बाजार सावध होता. भाजपाला निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाचा जल्लोष आगामी सप्ताहात बाजारात दिसू शकतो.