Join us

मटका केंद्रावर धाड

By admin | Updated: April 4, 2015 01:54 IST

पोलिसांची कारवाई : पाच जणांना अटक

पोलिसांची कारवाई : पाच जणांना अटक

लोणी काळभोर : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने एका मटका धंद्यावर टाकलेल्या धाडीत मालकासह पाच जणांना ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून ६२ हजार ३५ रुपये रोख रकमेसह दोन दुचाकी, असा एकूण १ लाख ३७ हजार ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तानाजी मानसिंग काळभोर (वय ४७, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर), रवींद्र अरुण ननवरे (३२, दत्तमंदिरामागे, लोणी काळभोर), भरत महादेव गायकवाड (२३) व संजय प्रभाकर धेडे (२२, दोघेही रा. मांजराईनगर,मांजरी बुद्रुक) आणी दत्ता निवृत्ती शिदे (४५, खोकलाई चौक, लोणी काळभोर) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, साधना पाटील, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, चंद्रकांत झेडे, व्ही. डी. मुत्तनवार, नीलेश कदम, उमाकांत कुंजीर, लता जगताप, ज्योती वांबळे, सी. जी. वाघ हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना तानाजी काळभोर हा पाषाणकर बागेतील सिंहगड बंगल्याशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या हस्तकांसह मटका चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून या मटका केंद्रावर धाड टाकली. यात त्यांनी जवळपास १ लाख ३७ हजार ६० रुपये असा माल जप्त केला आहे. (वार्ताहर)
०००