Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन क्षेत्रात गंधक, सक्ष्म अन्नद्रव्य वाढीवर भर

By admin | Updated: October 10, 2014 03:53 IST

विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र वाढत असून, या क्षेत्रातील गंधक, सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण घटत आहे. ही एक धोक्याची घंटा असल्याने,या घटकांचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे

अकोला : विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र वाढत असून, या क्षेत्रातील गंधक, सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण घटत आहे. ही एक धोक्याची घंटा असल्याने, या घटकांचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे विदर्भात शेती शाळा कार्यक्रम राबवून, शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे. शेतीतील गंधक व दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये घटत असल्याने कृषी विद्यापीठाने याचा गांभीर्याने विचार सुरू केला असून, विद्यापीठाच्या मृदविज्ञान व कृषी रसायन विभागांतर्गत अखिल भारतीय समन्वयित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये प्रकल्पाच्या वतीने विदर्भात शेती शाळांचे आयोजन करू न शेतकऱ्यांना या धोक्यापासून अवगत करण्यात येत आहे.गंधक व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिके, प्राणी आणि मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. या घटकांची जमिनीतील घसरण थांबवणे आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रीय खतासोबतच, संतुलित खताचा वापर यापुढे करावा लागणार आहे. कृषी विद्यापीठाने आदिवासी भागासह, विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात शेती शाळा कार्यक्रम सुरू केले आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून यासाठी जनजागृती सुरू आहे. असे असले तरी शेतीतील गंधक, दुय्यम अन्नद्रव्याचे संतुलन राखणे कठीणच होत चालले आहे. यासाठीचे मार्गदर्शन या शेती शाळांमधून करण्यात येत असले तरी, भरघोस पण कमी खर्चात उत्पादन काढण्याच्या मागे लागलेल्या शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात विद्यापीठ किती यशस्वी होते, हे येणारा काळच सांगणार आहे. यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, सामाजिक संघटनांना सामूहिक चळवळ राबवावी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.