Join us

पुरामुळे जम्मू-काश्मीरचे ३,७६४ कोटींचे नुकसान

By admin | Updated: September 22, 2014 23:07 IST

जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख विभागात नुकत्याच आलेल्या पुरामुळे तीन लाख हेक्टर्सवरील पिकांचे एकूण ३,६७४ कोटी रुपयांचे नुकसान झाले

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख विभागात नुकत्याच आलेल्या पुरामुळे तीन लाख हेक्टर्सवरील पिकांचे एकूण ३,६७४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जम्मू आणि काश्मीर कृषी विभागाने केलेल्या पाहणीत पुलवामा जिल्ह्याचे कृषी उत्पादनाचे सर्वाधिक म्हणजे १,१०४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. पुलवामातील पाम्पोर गावात केशरचे फार मोठे उत्पादन होते. हे गाव पाण्याने वेढले गेल्यामुळे ७७८ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या १,१०४ कोटी रुपयांत या ७७८ कोटी रुपयांचा समावेश आहे. भूभागाचा विचार केला, तर मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील ५२ हजार हेक्टर्सवरील पिकांचे पुरामुळे नुकसान झाले. ५५२ कोटी रुपयांचे उभे पीक या संकटाने हिरावून नेले. समाधानाची बाब अशी की, बडगाममधील बहुतेक नागरी वसाहतींना पुराचा फटका बसला नाही. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात ४० हजार हेक्टर्सवरील ४४७ कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले. बारामुल्ला जिल्ह्यात ३८६, तर दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात ३७४ कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले. शोपियान जिल्हा तुलनेने सुदैवी ठरला. तेथे केवळ ६६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. (वृत्तसंस्था)