मुंबई : भारत, हाँगकाँग आणि स्वीत्झर्लंड या देशांत करण्यात आलेल्या अनेक रहस्यमय सौद्यांप्रकरणी ट्रान्सजेन बायोटेक या औषध उत्पादक कंपनीच्या सीएमडीसह पाच अधिका-यांवर सेबीने प्रतिबंध घातला आहे. विदेशातील काळा पैसा परत आणण्याच्या प्रक्रियेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ट्रान्सजेन बायोटेक या कंपनीने एका जीडीआरच्या माध्यमातून ४.0६ कोटी डॉलर उभे केले होते. त्यातील २.९९ कोटी डॉलरची रक्कम एका अनुषंगिक कंपनीला हस्तांतरित करण्यात आली. ही रक्कम अघोषित तथा गोपनीय उद्देशांच्या नावाखाली हस्तांतरित करण्यात आली होती. हा निधी स्वीत्झर्लंडच्या एका बँकेत ठेवण्यात आला होता. त्यातील काही हिस्सा नंतर हाँगकाँग आणि कॅनडाच्या दुसऱ्या एका कंपनीत स्थानांतरित करण्यात आला. या प्रकरणी कंपनीच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. सेबीने म्हटले की, ट्रान्सजेनच्या संपूर्ण जीडीआर निर्गमाची विस्तृत चौकशी होणे गरजेचे आहे. हा पैसा अंतिमत: कोठे वापरला गेला, हे कळण्यासाठी चौकशीची आवश्यकता आहे. या कंपनीने २0११-१२ या वर्षात कंपनीने जीडीआर हस्तांतरणातून अतिरिक्त निधी आपणास मिळाला असल्याचा दावा केला होता. तथापि, या दाव्यात काही अर्थ नाही, असे सेबीला वाटते. (प्रतिनिधी)
सीएमडीसह पाच अधिका-यांवर प्रतिबंध
By admin | Updated: November 24, 2014 01:46 IST