Join us
Daily Top 2Weekly Top 5

संपाचा पहिला दिवस ‘फिफ्टी-फिफ्टी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 03:58 IST

व्यावसायिक वाहनचालकांचा बेमुदत संप शुक्रवारी पहिल्या दिवशी संमिश्र ठरला.

मुंबई : व्यावसायिक वाहनचालकांचा बेमुदत संप शुक्रवारी पहिल्या दिवशी संमिश्र ठरला. मोठ्या बाजारपेठांना मालपुरवठा करणाऱ्या राज्यातील बहुतांश ट्रकची चाके थांबली, पण स्कूल बस मालक संभ्रमात दिसले. टँकरचालकांनी तीन दिवस वाट पाहून मंगळवारी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. शहरांतर्गत ये-जा करणारे टेम्पोसुद्धा धावताना दिसले.डिझेल दर कमी करणे अथवा भाडेदर वाढ करण्याची परवानगी देण्याच्या मुख्य मागणीसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने संप पुकारला आहे. महाराष्टÑ ट्रक, टेम्पो, बस व टँकर वाहतूक महासंघाने त्याला पाठिंबा दिला आहे. राज्यातील २०० संघटना महासंघाशी संलग्नीत आहेत.नवी मुंबईतील वाशी येथील बाजारपेठ, जेएनपीटी बंदरासह (न्हाव्हा शेवा) पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, अकोला या प्रमुख बाजारपेठांशी संलग्नीत ट्रक्स मालक संपात सहभागी झाले होते. २० टक्के ट्रक बाहेर गेल्याने अद्यापही ते संपावर नाहीत, पण पुढील दोन दिवसांत संपाचा परिणाम १०० टक्के दिसेल, असे महासंघाचे सचिव दयानंद नाटकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.स्कूल बस मालकांच्या संपाचा निरोप बस मालकांपर्यंत पोहोचण्यास विलंब झाला. त्यात बहुतांश शाळांनी स्कूल बसेस कंत्राटावर घेतल्या आहेत. या बसेसही धावताना दिसल्या.पेट्रोल-डिझेल जीवनावश्यक श्रेणीत असल्याने, तीन दिवस वाट पाहून त्यानंतर मंगळवारी संपाचा निर्णय पेट्रोल-डिझेल टँकर मालकांनी घेतला आहे. यानुसार, मंगळवारी राज्यभरातील पेट्रोल पंपांना इंधनाचा पुरवठा होणार नाही. केवळ कंपन्यांनी कंत्राटावर घेतलेले ३० टक्के टँकर्स धावतील.>मोठ्या बाजारपेठेत नागपूर सुरूचराज्यातील मोठ्या बाजारपेठांशी संलग्न ८० टक्के ट्रकमालकांनी शुक्रवारी माल उचलला नाही, पण त्याच वेळी उपराजधानी नागपुरात असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या कळमना बाजारपेठेत ट्रक्सची ये-जा नियमित होती. पाच जिल्हा संघटना संलग्नीत असलेल्या तेथील मोठ्या संघटनेने संपातून ऐन वेळी माघार घेतल्याने संपाचा परिणाम जाणवला नाही.