Join us  

Yes Bank आर्थिक डबघाईला; राणा कपूर यांनी 510 कोटींना विकले शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 10:00 AM

यस बँकेचे संस्थापक, संचालक असलेल्या राणा कपूर यांनी बँकेतली 2.16% भागीदारी 510 कोटींना विकली.

नवी दिल्लीः यस बँकेचे संस्थापक, संचालक असलेल्या राणा कपूर यांनी बँकेतली  2.16% भागीदारी 510 कोटींना विकली. त्यानंतर या बँकेचे शेअर्सही गडगडायला लागले आहेत. 26-27 सप्टेंबरला राणा यांनी शेअर्सची विक्री खुल्या बाजाराच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे Yes Bankच्या शेअर्समध्ये मंगळवारी 22 टक्क्यांची घसरण झाली. आर्थिक क्षेत्रात वाढत्या अडचणी, वाहन क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे गुंतवणूकदार निरुत्साही झाले असून, सेन्सेक्समध्येही 362 अंकांची कपात नोंदवली गेली होती. येस बँकेची विक्री केल्यानंतर कपूर आणि त्यांच्या ग्रुपची भागीदारी कमी होऊन 4.72 टक्क्यांएवढीच राहिली आहे. खरं तर येस बँकेचे संस्थापक-संचालक असलेल्या राणा कपूर यांना आरबीआयनं संचालकपदावरून हटवल्यानंतर बँकेची ही दुर्दशा सुरू झाली आहे. बँकेकडून एनपीएची योग्य माहिती न दिल्याकडून आरबीआयनं ही कारवाई केली होती. आरबीआयनं येस बँकेला एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. बँकेवरून सातत्यानं होत असलेल्या आरबीआयच्या कारवाईमुळे मोठ्या गुंतवणूकदारांचाही धीर खचला होता.आता राणा कपूर यांनी बँकेची भागीदारी विकली असून, बँकेनं ज्या कंपन्यांना कर्ज दिलं आहे, त्यांची अवस्थाही फार बिकट आहे. यात एस्सेल ग्रुप, अनिल अंबानींची एडीएजी, दिवान हाऊसिंग आणि इंडियाबुल्स हाऊस या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी )च्या संकटातून उभारी घेण्यासाठी येस बँकेनं शेअर्स विक्रीचा धडाका लावला आहे. पीएमसी, येस बँका दिवसेंदिवस डबघाईला जात आहेत. त्यामुळे या बँकांना एनपीएतून बाहेर काढण्यासाठी आरबीआय आणि केंद्र सरकार काय पावलं उचलतं हे येत्या काळातच समजणार आहे. 

टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँक