Join us

एक टक्का भारतीयच भरतात कर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 02:51 IST

प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्राप्तिकर विभागातर्फे कितीही जोमाने प्रयत्न होत असले तरी, अद्यापही लोकसंख्येच्या केवळ एक टक्का लोकच प्राप्तिकर

मुंबई : प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्राप्तिकर विभागातर्फे कितीही जोमाने प्रयत्न होत असले तरी, अद्यापही लोकसंख्येच्या केवळ एक टक्का लोकच प्राप्तिकर भरत असल्याची माहिती पुढे आली आहे. प्राप्तिकर विभागाने नुकताच २००१ ते २०१३ या वर्षांकरिताची करदात्यांच्या नावांसह असलेली कर विवरणाची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्याद्वारे ही बाब उजेडात आली आहे. एक कोटी करदात्यांची संख्या ही २०१२-१३ या आर्थिक वर्षातील आहे. कारण त्याअगोदरच्या तुलनेत या वर्षी करदात्यांची संख्या आणि कर संकलानाच्या प्रमाणातही वाढ दिसून आली होती. २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६ या आर्थिक वर्षाची आकडेवारी अद्याप खुली झालेली नाही. पण तरीही प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या मते प्रत्यक्ष कर भरणाऱ्यांची संख्या आणखी किमान ३ ते ५ लाखांनी वाढेल. प्रथमच प्राप्तिकर विभागाने करदात्यांची माहिती उघड केली असून यानुसार, २०१२-१३ या आर्थिक वर्षात एकूण २ कोटी ८७ लाख प्राप्तिकराचे विवरण दाखल केले. मात्र यापैकी अवघ्या १ कोटी लोकांचेच उत्पन्न करपात्र उत्पन्न या संज्ञेत मोडत असून अशा लोकांनीच करभरणा केलेला आहे. या एक कोटी लोकांपैकी कर भरण्याच्या अनुषंगाने ज्यांची ‘श्रीमंत’ अशी गणना करावी अशा केवळ ५४३० व्यक्ती असून या लोकांनी एक कोटी रुपये अथवा त्यापेक्षा जास्त कर भरणा केलेला आहे. तर एकूण करदात्यांनी भरलेल्या कराची सरासरी विचारात घेता, सरासरी २१ हजार रुपयांचा करभरणा झालेला आहे. (प्रतिनिधी)नव्या करदात्यांचा मोठ्या प्रमाणावर शोध सुरूसरत्या तीन वर्षांत प्राप्तिकर विभागातर्फे नव्या करदात्यांचा आणि प्राप्तिकर विवरण भरणाऱ्या व्यक्तींचा मोठ्या प्रमाणावर शोध सुरू असून उपलब्ध माहितीनुसार, असे किमान २० लाख नवे लोक प्राप्तिकराच्या व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. पण या २० लाखांपैकी जेमतेम ३ ते ५ लाख लोक हे प्रत्यक्ष करदाते असू शकतील. या तीन वर्षांची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतरच पुढची माहिती हाती येऊ शकेल.