Join us

सण दसऱ्याचा, खरेदीस नाही तोटा!

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST


संबंधित फोटो घेता येईल.

- ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह : कोट्यवधींची उलाढाल

नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी बाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेला होता. मुहूर्तावर वाहन, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट, रेडिमेंड गारमेंटच्या व्यवसायात प्रचंड उलाढाल झाली. प्रत्येक बाजारात उत्साह संचारला होता. सण दसऱ्याचा, खरेदीस नाही तोटा, असा उत्साह ग्राहकांमध्ये होता. एकाच दिवशी कोट्यवधींची उलाढाल झाल्याची माहिती आहे.
वाहन खरेदीत उत्साह
वाहन खरेदी करण्यासाठी, किंबहुना वाहनाचा ताबा घेण्यासाठी वाहनप्रेमींनी गेल्या आठवड्यापासूनच कार डीलर्सच्या दुकानांमध्ये गर्दी केली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर नागपुरात सुमारे चारचाकी ४०० तर ३ हजार दुचाकींची विक्री झाल्याची माहिती आहे. गाड्या विक्रीची तंतोतंत नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून मिळू शकली नाही. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच बुकिंगला वेग येतो. गेल्या दोन महिन्यांत विविध कार कंपन्यांनी विविध मॉडेल्स बाजारात सादर केले. त्यामुळेच ग्राहकांचा विशेष कल दिसून आला. विशेष म्हणजे हौशी लोकांनी विशेष नंबर मिळावा, याकरिता पाच हजारांपासून तीन लाख रुपयांपर्यंत पैसे मोजले आहेत.
घसरणीमुळे सोने खरेदी जास्त
दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदी शुभ मानली जाते. प्रति दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे २७,५०० हजारांच्या आसपास तर २२ कॅरेट सोने २७ हजारांच्या आत असल्याने ग्राहकांमध्ये खरेदीचा प्रचंड उत्साह होता. चेन , अंगठी , हार , नेकलेस, पेंडंट, कुंदन सेट, पाटल्या, बांगड्या यांची खरेदी जोरात झाली. इतवारी आणि धरमपेठ बाजारात कधी नव्हे एवढी गर्दी होती. बऱ्याच दिवसानंतर ग्राहकांची पावले सराफा बाजाराकडे वळल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
फ्लॅट्सचे बुकिंग जोरात
बांधकाम क्षेत्राला लागलेले मंदीचे ग्रहण सुटण्यास सुरुवात झाली असून, दसऱ्याच्या दिवशी किमान हजार फ्लॅट्सचे बुकिंग झाल्याचा अंदाज बांधकाम व्यावसायिक व्यक्त केला. वर्षभरात होणाऱ्या एकूण व्यवसायापैकी दसरा-दिवाळीमध्ये होणाऱ्या बुकिंगची संख्या लक्षणीय होती.
इलेक्ट्रॉनिक बाजारात गर्दी
इलेक्ट्रॉनिक बाजारातही उत्साही वातावरण दिसले. लोकांनी कर्ज योजनेपेक्षा थेट रोखीने वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले. एलसीडी, एलईडी, थ्री-डी टीव्ही, प्लाज्मा, वॉशिंग मशीन आदींना मोठी मागणी होती. बाजारात सुमारे २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.