Join us

फौजिया खान यांना मंत्रीपदापासून मुक्त करा

By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST

- शिवसेनेची राज्यपालांकडे मागणी

- शिवसेनेची राज्यपालांकडे मागणी
मुंबई : शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या आमदारकीची मुदत मार्चमध्ये संपली. त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत त्यांचा समावेश झाला नाही. खान यांचा बिगर सदस्य मंत्रीपदाचा कार्यकाल गुरुवारी संपुष्टात आल्याने एकतर त्यांना मंत्रीपदापासून मुक्त करा अन्यथा पुन्हा मंत्रीपदाची शपथ द्या, अशी मागणी शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते दिवाकर रावते यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली.
रावते यांनी यासंदर्भात गुरुवारी राज्यपालांची भेट घेतली. ते म्हणाले की, फौजिया खान यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाल १२ मार्च २०१४ रोजी संपला. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद संपुष्टात यायला हवे होते. कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसताना मंत्रीपदावर ठेवल्यास संबंधित व्यक्तीला राज्यघटनेतील तरतुदीनुसार सहा महिन्यांच्या आत दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे गरजेचे आहे. विधान परिषद सभापतींच्या निदर्शनास ही बाब आपण आणली होती. आपल्या हरकतीवर सभापतींनी निर्णय राखून ठेवला होता. खान यांची आमदारकीची मुदत संपून गुरुवारी सहा महिने झाले. आता एकतर त्यांना मंत्री पदावरून मुक्त तरी करा किंवा नव्याने शपथ द्या, अशी मागणी रावते यांनी केली.
खडसे यांची राज्यपालांना सदिच्छा भेट
विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी राजभवनावर जाऊन राज्यपाल सी विद्यासागर राव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)