Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजीचा पाचवा दिवस!

By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST

सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारांनी उत्तम कामगिरी केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७७ अंकांनी वर चढून २८,८८५.२१ अंकांवर गेला

मुंबई : सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारांनी उत्तम कामगिरी केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७७ अंकांनी वर चढून २८,८८५.२१ अंकांवर गेला. हा सेन्सेक्सचा एक महिन्याचा उच्चांक आहे. मुडीजने भारताचे रेटिंग वाढविल्यामुळे बँक क्षेत्रातील समभागांत जोरदार खरेदी झाली. त्याचा परिणाम म्हणून बाजार वर चढला.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स दिवसभर अस्थिर होता. तेजीने उघडूनही बाजार नंतर घसरणीला लागला. २८,६२२.४४ अंकांपर्यंत तो खाली घसरला होता. हा नफा वसुलीचा परिणाम होता. दुपारच्या सत्रात पुन्हा खरेदीचा जोर वाढला. सेन्सेक्स १७७.४६ अंकांनी अथवा 0.६२ टक्क्यांनी वाढून २८,८८५.२१ अंकांवर बंद झाला. १२ मार्च रोजी सेन्सेक्स २८,९३0.४१ अंकांवर बंद झाला होता. त्यानंतरची सर्वोच्च पातळी त्याने आता गाठली आहे. गेल्या ५ सत्रांत सेन्सेक्स ९२७.७२ अंकांची वाढ मिळविली आहे. ५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६३.९0 अंकांनी अथवा 0.७३ टक्क्यांनी वाढून ८,७७८.३0 अंकांवर बंद झाला. सत्रादरम्यान तो ८,७८५.५0 आणि ८,६८२.४५ या अंकांच्या मध्ये खाली-वर होताना दिसून आला. आशियाई बाजारांत संमिश्र कल दिसून आला. जपान, हाँगकाँग येथील बाजार 0.७५ टक्के ते २.७0 टक्के वाढले. चीन, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार 0.0१ टक्के ते 0.९३ टक्के घसरले. युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रात तेजीचे वातावरण दिसून आले. जर्मनीने जाहीर केलेला आर्थिक डाटा सकारात्मक राहिल्याचा चांगला परिणाम युरोपीय बाजारांवर झाला. जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन येथील बाजार 0.३५ टक्के ते 0.७९ टक्के वाढले. गेल्या आठवड्याच्या अखेरीस शेअर बाजार तेजीत आला. त्यानंतर ही तेजी कायम आहे. (वृत्तसंस्था)