मुंबई : शेअर बाजारातील सलग ९ सत्रांच्या तेजीला बुधवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७५ अंकांनी घसरून २७,७२९.६७ अंकांवर बंद झाला. आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीकचा कर्जासंबंधीचा प्रस्ताव कर्जदात्यांनी फेटाळला असल्याचे वृत्त आल्यानंतर बाजारात शेवटच्या अर्ध्या तासात विक्रीचा प्रचंड जोर वाढला. त्यामुळे बाजार घसरला. सेन्सेक्स सकाळपासून तेजीत होता. एका क्षणी तो २७,९४८.२४ अंकांवर गेला होता. २00 अंकांपेक्षाही जास्त वाढ त्याने मिळविली होती. शेवटच्या अर्ध्या तासात हे २00 अंक त्याने गमावले. एका क्षणी तो २७,६४७.२९ अंकांपर्यंत खाली घसरला. सत्राच्या अखेरीस ७४.७0 अंकांची अथवा 0.२७ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २७,७२९.६७ अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दिवसभर तेजीत होता. एका क्षणी तो ८,४२१.३५ अंकांपर्यंत वर चढला होता. सत्राच्या अंतिम टप्प्यात नफावसुलीचा फटका बसल्याने निफ्टी २0.७0 अंकांनी अथवा 0.२५ टक्क्यांनी घसरून ८,३६0.८५ अंकांवर बंद झाला. युरोपीय बाजारांतही घसरणीचाच कल दिसून आला. फ्रान्स आणि जर्मनीचे बाजार 0.0५ टक्के ते 0.३0 टक्के घसरले. ब्रिटनचा एफटीएसई मात्र 0.४३ टक्क्यांनी वर चढला. आशियाई बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले. चीन, हाँगकाँग, जपान, तैवान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील बाजार 0.२१ टक्के ते २.४८ टक्के वाढले.१,४९६ कंपन्यांचे समभाग घसरले. १,२२२ कंपन्यांचे समभाग वाढले. १३४ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल वाढून २,६२९.३३ कोटी झाली. आदल्या सत्रात ती २,४८५.२७ कोटी होती.
तेजीला ब्रेक; सेन्सेक्स ७५ अंकांनी घसरला
By admin | Updated: June 24, 2015 23:53 IST