Join us

शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड थांबविली!

By admin | Updated: April 7, 2017 00:17 IST

उत्तर प्रदेशातील कर्जमाफीच्या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो याबाबत बँकांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरत आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कर्जमाफीच्या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो याबाबत बँकांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरत आहे. कारण, या राज्यात शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीनंतर आता इतर राज्यांतील शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरणेच थांबविल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे ३६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचे कर्ज माफ केले आहे. भाजपने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची या निमित्ताने पूर्तता करण्यात आली आहे. या निर्णयाचा राज्यातील लहान व मध्यम वर्गातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तथापि, बँकांवर याचा नकारात्मक परिणाम होणार नाही. कारण, राज्य सरकार बँकांकडील कर्जाची भरपाई देणार आहे. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील बँका मात्र या निर्णयावर नाखुश आहेत. बँकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तामिळनाडू आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात आमच्या बँकाचे कर्जदार अगोदरच नियमित परतफेड करत नाहीत. त्यातच अशा निर्णयामुळे आमच्या वसुलीवर परिणाम होईल. एका अन्य बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, काही शेतकऱ्यांनी आताच आम्हाला विचारणा करायला सुरुवात केली आहे की, त्यांना कर्जाची परतफेड करण्याची गरज नाही का? असे कर्ज अनुत्पादित कर्जात (एनपीए) जमा झाल्यास बँकांना त्याची भरपाईही मिळणार नाही. उत्तर प्रदेशात कर्जमाफीची प्रक्रिया कशी राबविली जाते याचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. उत्तर प्रदेशात सर्व बँकांनी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जाची रक्कम ८६ हजार कोटींपेक्षा अधिक आहे. तेथील कर्जमाफीच्या पद्धतीचा अभ्यास करू असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. कारण, सहकारी पक्ष शिवसेना आणि विरोधी पक्ष कर्जमाफीची मागणी करत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)>बँकांचा विरोध; शेतकऱ्यांना मदत करा पण, शिस्त मोडू नकाकर्जमाफीच्या या पद्धतीलाच बँकांनी विरोध केला आहे. शेतकऱ्यांचे समर्थन करण्याची ही पद्धत योग्य नाही. अशा निर्णयामुळे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर त्याचा प्रतिकू ल परिणाम होत असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एसबीआयच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या की, जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता, तेव्हा कर्ज आणि बँकेच्या व्यवहारातील शिस्तच मोडली जाते. पैसा आजही परत येईल. कारण, सरकार हा पैसा देणार आहे. पण, भविष्यात आम्ही पुन्हा कर्ज देऊ, तेव्हा शेतकरी पुढच्या निवडणुकीची वाट पाहत राहतील. शेतकऱ्यांना मदत करा. पण, शिस्त मोडू नका, असेही त्या म्हणाल्या.