Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा खासगी कंपन्यांसोबत करार !

By admin | Updated: September 15, 2014 05:02 IST

करार शेतीनंतर आता राज्यातील शेतकरी खासगी क्षेत्र, शासकीय साखळी (पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्त्वावर शेती विकास करण्यावर भर देत

अकोला : करार शेतीनंतर आता राज्यातील शेतकरी खासगी क्षेत्र, शासकीय साखळी (पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्त्वावर शेती विकास करण्यावर भर देत असून, उत्पादित मालाच्या बाजारपेठेसाठी विदेशी कंपन्यांसोबत करार करण्यात येत आहे. सध्या बटाट्याला चांगली मागणी असल्याने या पिकावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बटाट्याचे बियाणे राज्यातच निर्माण करण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.शेतकरी, खासगी क्षेत्र व शासन या पातळीवरील प्रयोगाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, शेतकऱ्यांच्या कंपन्या व खासगी क्षेत्राच्या एकत्रीकरणाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली भर पडली आहे.एका खासगी कंपनीने सुरुवातीला घेतलेल्या सहभागामुळे शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. सुरुवातीला ढोबळी मिरची, बेबीकॉर्न, बटाटा आदी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात आले असून, या सर्वच पिकांना चांगली बाजारपेठ मिळाली आहे; तथापि बटाटा या पिकाला जास्त मागणी असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांनी या पिकाकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले असून, त्यासाठी निर्यातक्षम बटाटा तयार करण्यात येत आहे; परंतु बटाट्याचे बियाणे राज्यात उपलब्ध नसल्याने येथील शेतकऱ्यांना पंजाब राज्यातून बियाणे आणून लागवड करावी लागत आहे.राज्यात बटाटा बियाणे निर्माण करण्यात यावे, यासाठी राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी पुढाकार घेतल्याने राज्यातच बटाटा बियाणे निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी खासगी क्षेत्र, शासन व विदेशी कंपन्यांनी सहकार्य करण्याचे ठरले आहे. याकरिता ‘मोईज’ या विदेशी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. भारतातील खासगी व विदेशी कंपन्या, तसेच शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपन्या व शासन या माध्यमातून या नव्या पर्वाला राज्यात सुरुवात झाली असून, विविध शेतमाल उत्पादनासह त्यावर प्रक्रिया करण्यावरही भर देण्यात आला आहे. यासाठी नुकतीच पुण्यात शेतकरी, खासगी उद्योजक, विदेशी कंपन्यांचे प्रतिनिधी व शासनाच्या प्रतिनिधींची परिषद पार पडली. (प्रतिनिधी)