Join us

कांदा दर पडल्याने शेतकरी आक्रमक

By admin | Updated: September 2, 2014 00:33 IST

- सौदे पाडले बंद : कोल्हापुरात व्यापार्‍यांकडून अरेरावी

- सौदे पाडले बंद : कोल्हापुरात व्यापार्‍यांकडून अरेरावी
कोल्हापूर : कांद्याचे दर पडल्याने संतप्त शेतकर्‍यांनी सोमवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सौदे बंद पाडले. इतर मार्केटप्रमाणे दर देण्याची मागणी करीत पावसातच सौदा मार्केटमध्येच शेतकर्‍यांनी ठिय्या मारला. सौदे बंद केल्यानंतर एका व्यापार्‍याने अरेरावीची भाषा केल्याने शेतकरी व व्यापार्‍यांत खडाजंगी झाली.
बाजार समितीत सोमवारी २३ गाड्यांची आवक झाली. सकाळी अकरा वाजता कांदा सौदे सुरू झाले. अठरा रुपयांच्यावर दर जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकर्‍यांनी सौदे बंद पाडले. समितीचे सचिव संपतराव पाटील, सहायक सचिव मोहन सालपे यांनी शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण इतर मार्केटप्रमाणे दर मिळाला पाहिजे, या मागणीवर शेतकरी ठाम राहिले.
नागपूर, भिवंडी मार्केटमध्ये २२ रुपये किलोने कांदा आहे, मग येथे कमी का? अशी विचारणा करीत, शुक्रवारी १४ रुपयांनी विकलेल्या कांद्याचा साडेसहा रुपये दर काढता, ही मनमानी चालणार नाही, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला. तसेच संबंधित व्यापार्‍याने माफी मागितल्याशिवाय सौदे सुरू होणार नसल्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला. अखेर दुपारी अडीच वाजता समिती प्रशासनाने शेतकरी व व्यापार्‍यांबरोबर बैठक घेऊन वादावर तोडगा काढला. दुपारी तीननंतर सौदे पूर्ववत सुरू झाले. (प्रतिनिधी)
-----
मग्रुर व्यापार्‍यांचा परवाना रद्द करा
व्यापार्‍यांना कांदा परवडत नसेल तर बाजार समितीने मार्केट बंद करीत असल्याचे सांगावे. शेतकरी आपला पर्याय बघेल. दोनशे किलोमीटरवरून येऊन अपमान करता हे चुकीचे असल्याचे सांगत, शेतकर्‍यांना अरेरावी करणार्‍या व्यापार्‍यांचा परवाना रद्द करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली.
--------------
फोटो- ०१ कोल्हापूर ०१
कांद्याचे दर घसरल्याने संतप्त शेतकर्‍यांनी सौदे बंद पाडत कांदा मार्केटमध्येच ठिय्या मारला. (छाया - दीपक जाधव)