Join us
Daily Top 2Weekly Top 5

निराशेच्या ढगांमुळे सलग तिसरा सप्ताहही घसरणीचा

By admin | Updated: June 15, 2015 00:49 IST

देशामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा सातत्याने व्यक्त होत असलेला अंदाज, अमेरिकेकडून व्याजदरामध्ये वाढ होण्याची बांधली जाणारी अटकळ,

देशामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा सातत्याने व्यक्त होत असलेला अंदाज, अमेरिकेकडून व्याजदरामध्ये वाढ होण्याची बांधली जाणारी अटकळ, परकीय वित्तसंस्थांनी केलेली मोठी विक्री अशा अनेक कारणांमुळे शेअर बाजारात गतसप्ताह निराशेचाच राहिला. सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये बाजारात मोठी घसरण झालेली दिसून आली. मुंबई शेअर बाजारात गत सप्ताह निराशेचा ठरला. परकीय वित्त संस्थांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याने आधीच मंदीत असलेला बाजार आणखी खाली घसरला. सप्ताहाअखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३४३.१९ अंशांनी म्हणजेच १.२८ टक्क्यांनी घसरून २६४२५.३0 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १.६२ टक्के म्हणजेच १३१.८0 अंशांनी खाली आला. हा निर्देशांक आठ हजारांच्या खाली येऊन ७९८२.९0 अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकामध्ये अनुक्रमे २.२ आणि २.५६ टक्के घट झालेली दिसून आली. बाजारात गुंतवणुकीसाठी कोणी फारसे उत्सुक असलेले दिसून येत नाही. देशातील पावसाचे प्रमाण यंदा कमी राहण्याचा अंदाज विविध यंत्रणांमार्फत व्यक्त केला जात आहे. पाऊस कमी झाल्यास त्याचा परिणाम शेतीवर आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार असून, त्यामुळे चलनवाढ होण्याचा धोका दिसत आहे. चलनवाढ झाल्यास रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरामध्ये कपात केली जाण्याची शक्यता धूसर होत आहे. यामुळेच कमी पावसाने बाजारावर काळजीयुक्त निराशेचे ढग जमले असून, त्याचा परिणाम बाजार खाली येण्यात होऊ लागला आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्यता बाजाराला वाटत असून, तेथे गुंतवणुकीची संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी परकीय वित्त संस्थांनी विक्रीचे स्वीकारलेले धोरण बाजाराच्या घसरणीला हातभार लावणारे ठरत आहे.गत सप्ताहात केंद्र सरकारने काही प्रकल्पांना दिलेली मंजुरी, तसेच साखर उद्योगाला बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा हे खरे तर बाजाराला मिळालेले टॉनिक होते. त्याचजोडीला देशाच्या चालू खात्यावरील तूट कमी झाल्याची जाहीर झालेली आकडेवारी बाजाराला समाधानाची बाब ठरणारी होती; मात्र बाजारावरील निराशेच्या ढगांनी या आशावादी वृत्तांना बाजाराच्या जवळपासही फिरकू दिलेले नाही.