नवी दिल्ली : जागतिक बाजारात घसरणीचा कल राहिल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात मंगळवारी घट नोंदली गेली. आज सोन्याचा भाव मागणीअभावी २० रुपयांच्या घसरणीसह २७,२३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.व्यापाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या पातळीवर आभूषण निर्माते व सराफा व्यापारी यांची मागणी घटल्याने सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात हा कल नोंदला गेला आहे. देशांतर्गत बाजार कल निश्चित करणाऱ्या सिंगापूर येथे सोन्याचा भाव १,२१३.८४ डॉलरवरून १,२१३.२१ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. चांदीचा भावही ०.३ टक्क्यांनी घटून १६.९३ डॉलर प्रतिऔंसवर आला. राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २० रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे २७,२३० रुपये व २७,०८० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. यात गेल्या चार सत्रांत ६७५ रुपयांची वाढ नोंदली गेली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,७०० रुपयांवर कायम राहिला. दुसरीकडे तयार चांदीचा भावही ५०० रुपयांनी कोसळून ३८,००० रुपये प्रतिकिलो व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव २९० रुपयांच्या घसरणीसह ३७,८९० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. तथापि, चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५७,००० रुपये व विक्रीकरिता ५८,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याच्या भावात घसरण
By admin | Updated: April 7, 2015 23:16 IST