Join us

नोटाबंदीमुळे चीनने भारताला टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 00:35 IST

भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे भारताचा वृद्धीदर मंदावला आणि दुसऱ्या स्थानी असलेल्या चीनला वेगाने विकास करणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या शर्यतीत पुन्हा पहिले स्थान मिळाले. चीनमधील एका दैनिकाने हे विश्लेषण केले आहे.चीनचे सरकारी मालकीचे वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये हे विश्लेषण करण्यात आले आहे. भारताच्या घसरलेल्या वृद्धीला मोदी यांचे नोटाबंदीचे धोरणच कारणीभूत असल्याचे त्यात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर यंदाच्या पहिल्या तिमाहीत घसरून ६.१ टक्क्यांवर आला. त्यामुळे चीनला सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होण्याची संधी पुन्हा मिळाली आहे.शियाओ शीन यांनी ग्लोबल टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, भारत आणि चीन यांच्यात वृद्धीदरावरून जोरदार स्पर्धा सुरू आहे. ‘हत्ती विरुद्ध ड्रॅगन’ अशी ही शर्यत आहे. तथापि, या शर्यतीत भारताला जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळे चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चीनला पुन्हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनता आले. हत्ती ड्रॅगनपुढे हरला आहे. तत्पूर्वी काल, भारताचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा केला होता. भारतीय अर्थव्यवस्था नोटाबंदीच्या आधीच मंदीत आली होती, असे त्यांनी म्हटले होते. भारत आणि चीन हे जगातील सर्वाधिक वेगवान वृद्धी असलेले देश आहेत. ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये म्हटले की, महत्त्वाकांक्षी सुधारणा राबविताना देशाने गांभीर्याने विचार करायला हवा. अर्थव्यवस्थेवर ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला कसा फटका बसला हे दिसून आलेच आहे. नोव्हेंबरमधील नोटाबंदीसारख्या आमूलाग्र बदल घडविणाऱ्या सुधारणा राबविताना भारत सरकारने यापुढे दोनदा विचार करायला हवा.