नवी दिल्ली : डाळींचा काळाबाजार, तसेच साठेबाजी रोखण्यासाठी डाळींच्या आयातीवर केंद्रीय गुप्तचर संस्था नजर ठेवून आहेत. या वस्तूंच्या किमतीत तेजी आणण्यासाठी होणाऱ्या गैरप्रकारांवर अंकुश लावण्याचा त्यामागे हेतू आहे.गुप्तचर विभाग (आयबी) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी व्यापारी आणि साठेबाजांना अशा प्रकारच्या अवैध कारवाया करण्यावरून सावध केले. गेल्या वर्षी ५५ लाख टन डाळींची आयात झाली होती. त्यातील मोठ्या प्रमाणावरील आयात खासगी व्यापाऱ्यांमार्फत करण्यात आली. आता डाळींचे भाव २०० रुपये प्रति किलोच्या आसपास पोहोचल्यावर सरकारने हे पाऊल उचलले आहे.केंद्रीय संस्था आणि प्राप्तीकर विभागाचे अधिकारी साठेबाजी रोखण्यास गेल्या काही दिवसांपासून छापे मारीत आहेत. गेल्या काही महिन्यांत जवळपास १४ हजार धाडी टाकण्यात आल्या आणि १.३३ लाख टन डाळी जप्त करण्यात आल्या. व्यापाऱ्यांनी यंदा आतापर्यंत तीन दशलक्ष टन डाळींच्या आयातीचे करार केले आहेत. ही आयात अंदाजे दोन अब्ज अमेरिकी डॉलरच्या आसपास आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने डाळींचे भाव वाढत आहेत. येणाऱ्या वर्षात डाळींच्या मागणीत १० लाख टनापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयात आवश्यक ठरली आहे. या पार्श्वभूमीवर काळाबाजार आणि तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साठेबाज नफेखोरी करण्यासाठी परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न करू शकतात.विशेषत: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांत साठेबाजी होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांवर गुप्तचरांची कडवी नजर आहे. अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटण्यासाठी साठेबाजी करणारे शेजारच्या राज्यातील गोदामात साठे करीत आहेत.
डाळ आयातीवर गुप्तचरांची नजर
By admin | Updated: June 20, 2016 04:30 IST