नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑटो डेबिट सुविधेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे लक्षावधी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. अनेक ग्राहक वीजबिलांसह सबस्क्रिप्शन्ससाठी बँक खात्यातून त्याचे पैसे परस्पर वळते होतील या दृष्टीने ऑटो डेबिटचा लाभ घेतात.बँकांद्वारे ग्राहकांना ही ऑटो डेबिट सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, रिझर्व्ह बँकेने नव्या नियमावलीनुसार १ एप्रिलपासून ही सुविधा बंद करण्याचे निर्देश दिले होते. ही सुविधा पूर्ववत करण्यासाठी ग्राहकांना बँकेकडे रीतसर अर्ज दाखल करण्याची सक्ती रिझर्व्ह बँकेने केली होती. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. अखेरीस बुधवारी, ३१ मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने या सुविधेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देत असल्याचे जाहीर केले. ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
ऑटो डेबिट सुविधेला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 07:04 IST