Join us

कोरोनाच्या संकटकाळातही ही कंपनी कर्मचाऱ्यांना पगारवाढ, प्रमोशन देणार

By बाळकृष्ण परब | Updated: October 14, 2020 18:54 IST

Infosys News : देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देइन्फोसिसची जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीमधील कामगिरीची आकडेवारी आली समोर इन्फोसिसचे नेट प्रॉफिट जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ४ हजार ८४५ कोटी रुपयांनी वाढले दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी समोर आल्यानंतर इन्फोसिसने कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढी संदर्भात केली मोठी घोषणा

नवी दिल्ली - या वर्षी मार्च महिन्यापासून देशात सुरू झालेला कोरोना विषाणूचा फैलाव आणि कोरोनाला रोखण्यासाठी लागू करावे लागलेले लॉकडाऊन यामुळे देशातील छोट्यामोठ्या उद्योगधंद्यांसह अनेक मोठ्या कंपन्यांनाही जबर आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. दरम्यान,देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.इन्फोसिसची जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीमधील कामगिरीची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार या तिमाहीमध्ये इन्फोसिसच्या नेट प्रॉफिटमध्ये २०.५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. त्यानंतर देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे नेट प्रॉफिट जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ४ हजार ८४५ कोटी रुपयांनी वाढले आहे. २०१९ मध्या याच तिमाहीत कंपनीचे नेट प्रॉफिट ४०१९ कोटी रुपये एवढे होते. दरम्यान, दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी समोर आल्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढी संदर्भात मोठी घोषणा केली आहे.१ जानेवारी २०२१ पासून कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ आणि प्रमोशन लागू करण्यात येईल. ही वाढ आणि प्रमोशन सर्वच स्तरावर लागू केले जाईल, असे इन्फोसिसने सांगितले. कंपनीचे सीईओ सलील पारेख यांनी सांगितले की, डिसेंबरच्या तिमाहीत म्हणजेच तिसऱ्या तिमाहीत कंपनी विशेष बोनस देणार आहे. याशिवाय १०० टक्के व्हेरिएबल पेसुद्धा देण्यात येईल.

दरम्यान, कंपनीमध्ये सध्या २.४ लाख कर्मचारी काम करत आहेत. त्यांची पगारवाढ ही गेल्या वर्षीप्रमाणे होईल. २०१९ मध्ये कंपनीत काम करणाऱ्या ८५ टक्के कर्मचाऱ्यांना सरासरी ६ टक्के पगारवाढ मिळाली होती. दरम्यान, दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ५५०० नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी ३ हजार कर्मचारी हे फ्रेशर्स आहेत. कंपनी यावर्षी १६ हजार ५०० फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. तसेच पुढील वर्षीसुद्धा कंपनीकडून १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

टॅग्स :इन्फोसिसकोरोना वायरस बातम्याअर्थव्यवस्थाव्यवसाय