Join us

युरोपातील ६,३0,000 कार परत बोलावणार

By admin | Updated: April 23, 2016 03:18 IST

आॅडी, मर्सिडिस, ओपेल, पोर्श आणि फॉक्स वॅगन या कंपन्या प्रदूषणाच्या बाबतीत सदोष असलेल्या सुमारे ६,३0,000 गाड्या युरोपात परत बोलावणार आहेत. जर्मनीतील सरकारी सूत्रांनी ही माहिती शुक्रवारी दिली.

बर्लिन : आॅडी, मर्सिडिस, ओपेल, पोर्श आणि फॉक्स वॅगन या कंपन्या प्रदूषणाच्या बाबतीत सदोष असलेल्या सुमारे ६,३0,000 गाड्या युरोपात परत बोलावणार आहेत. जर्मनीतील सरकारी सूत्रांनी ही माहिती शुक्रवारी दिली.या जर्मन कंपन्यांनी वाहने परत बोलावण्याचा निर्णय स्वपुढाकाराने घेतला आहे. फॉक्स वॅगचा प्रदूषण सॉफ्टवेअर घोटाळा उघडकीस आल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, फॉक्स वॅगनने आपल्या गाड्यांत प्रदूषणाची पातळी कमी दाखविणारे सॉफ्टवेअर बसविले असल्याचे उघड झाल्यानंतर सर्वच महागड्या गाड्यांच्या प्रदूषणविषयक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांची तपासणी या मोहिमेत जर्मन सरकारने केली. अलीकडील काही महिन्यांत करण्यात आलेल्या या चाचणीचा अहवाल परिवहन मंत्रालयाला सादर होणार आहे. अनेक कंपन्यांच्या गाड्या विशिष्ट तापमानाला घातक नायट्रिक आॅक्साईड बाहेर सोडतात. या वायूचे उत्सर्जन थांबविण्यासाठी एक उपकरण गाडीच्या इंजिनात असते. घातक वायूचे उत्सर्जन प्रमाणाबाहेर झाल्यास हे उपकरण इंजिन बंद पाडते. तथापि, गाडी अशा प्रकारे बंद पडू नये यासाठी कंपन्यांनी हे उपकरणच सदोष बनविले. त्यामुळे प्रमाणाबाहेर नायट्रिक आॅक्साईड बाहेर पडूनही गाड्या बिनबोभाट सुरू राहिल्या. हे उपकरण बदलविण्याचे आदेश जर्मन सरकारने दिले आहेत.