मुंबई : सोन्यापाठोपाठ मौल्यवान धातू म्हणून लौकीक असलेल्या चांदीच्या व्यवहारांत सुसूत्रता यावी किंबहुना, चांदी उद्योगातील व्यावसायिकांना बळकटी मिळावी याकरिता इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने नुकतीच ‘वर्ल्ड सिल्व्हर असोसिएशन’ची स्थापना केली आहे. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. आयबीजेएचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या या कौन्सिलमुळे चांदीच्या उद्योगाला देशात आणि जागतिक पातळीवर अधिक बळकटी मिळणार आहे.या संदर्भात माहिती देताना कम्बोज म्हणाले की, भारतात वर्षाकाठी सात हजार टन चांदी आयात होते. प्रामुख्याने या चांदीचा वापर हा औद्योगिक कारणांसाठी होतो. तसेच, भारतात चांदीच्या वस्तू आणि दागिने यांनादेखील प्रचंड प्रमाणावर मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर, छोटे व्यापारी, उत्पादन, निर्माते आणि ग्राहक या सर्वांना चांदीच्या उद्योगात आपले म्हणणे मांडता यावे व ठोस अस्तित्व निर्माण करतानाच त्यांना बळटकी द्यावी याकरिता या कौन्सिलची स्थापना करण्यात आल्याचे ते म्हणाले. विशेषत: आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहारा करताना याचा मोठा फायदा व्यापाऱ्यांना होऊ शकेल. (प्रतिनिधी)
चांदी उद्योगासाठी वर्ल्ड सिल्व्हर कौन्सिलची स्थापना
By admin | Updated: December 31, 2015 02:48 IST