नवी दिल्ली : औषधी क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा सरकारचा विचार असून यात औषधी उद्योगाशी संबंधित सर्व विभागांचा समावेश असेल.अंतिम उपयोगकर्ता, ग्राहकांचा फायदा आणि या उद्योगाचा आकार पाहता औषधी क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे. या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मी आणि राज्यमंत्री हंसराज आहिर पंतप्रधानांची भेट घेणार आहोत, असे खतमंत्री अनंत कुमार यांनी सांगितले.सध्या औषधी मानक नियंत्रण संस्था आणि भारतीय औषधी महानियंत्रक आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. औषधींच्या आयातीवर नियामक नियंत्रण आणि नवीन औषधींना मंजुरी व चिकित्सा चाचणी आदी कामे या दोन्ही संस्था पाहतात. अत्यावश्यक औषधींच्या किमती ठरविण्याचे काम राष्ट्रीय औषधी मूल्य प्राधिकरण करते. हे प्राधिकरण रसायन आणि खत मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. या तीनही संस्थांना एकाच मंत्रालयात आणायचे झाल्यास औषधी मंत्रालय स्थापन करता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
औषधी क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार
By admin | Updated: March 13, 2015 00:31 IST