Join us

उद्योजकतेसाठी एबीएससारखे उपक्रम आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2016 06:48 IST

मराठी माणसांमध्ये उद्योजकता वाढवण्याकरिता मराठी बिझनेस एक्स्चेंजसारख्या (एमबीएक्स) कार्यक्रमांची गरज आहे, असे उद्गार खासदार अनिल देसाई यांनी काढले

मुंबई : मराठी माणसांमध्ये उद्योजकता वाढवण्याकरिता मराठी बिझनेस एक्स्चेंजसारख्या (एमबीएक्स) कार्यक्रमांची गरज आहे, असे उद्गार खासदार अनिल देसाई यांनी काढले. नेहरू एक्झिबिशन सेंटर येथे हे दोन दिवसीय उद्योग प्रदर्शन सुरू झाले असून, त्याच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्र चेम्बर आॅफ कॉमर्सचे चेअरमन शांतनु भडकमकर, मॅक्सेल फाउंडेशनचे नितीन पोतदार, वाधवा ग्रुपचे ज्योती प्रकाश, एलआयसीचे मार्केटिंग मॅनेजर शिरीष शुक्ला, क्रिस्टल ग्रुपचे प्रमुख व महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड, व्हिविड इव्हेंट्सचेचे साईनाथ दुर्गे हेही या वेळी उपस्थित होते. खासदार देसाई पुढे म्हणाले की, मराठी माणूस पुढे जातोय, ही आनंदाची बाब आहे. मराठी माणसाने एकमेकांच्या आधाराने पुढे जायला हवे. त्यासाठी एबीएक्ससारख्या कार्यक्रमांची आवश्यकता आहे. भडकमकर म्हणाले की, कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाचे नियोजन कसे करावे, याचा प्रथम विचार करायला हवा. भांडवल म्हणून पूर्वी जमिनीकडे पाहिले जात असे. नंतर सोने चांदी आणि आता रोख रक्कमच भांडवल समजले जाते. खरे तर उत्तम नेटवर्क हेच चांगले भांडवल आहे. मराठी माणसाची भरभराट होण्यासाठी व्यापाराचाही इतिहास लिहायला, वाचायला हवा. नवीन बिझनेस सुरू करण्यापूर्वी लोकांच्या गरजा ओळखाव्यात.नितीन पोतदार म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि नंतर ‘मेक इन महाराष्ट्र’ची संकल्पना आणली, पण या ‘मेक इन महाराष्ट्र’मध्ये आपला महाराष्ट्र कुठे आहे? तो दिसावा, यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे. या प्रदर्शनाद्वारे स्टार्ट अप ही संकल्पना राज्याच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजवण्यात येईल. प्रदर्शनाला येणाऱ्या गुंतवणूकदारांसोबत संवाद साधून, त्यांना भावी व्यवसायाची कल्पना व दृष्टिकोन मांडण्याची मिळेल.