Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा तरीही उत्साह

By admin | Updated: March 13, 2016 21:03 IST

संसदेमध्ये मंजूर झालेल्या विविध विधेयकांमुळे सरकार आर्थिक सुधारणांना गती देण्याचा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला आहे. याच जोडीला आगामी पतधोरणामध्ये व्याजदरात कपात होण्याची

प्रसाद गो. जोशी संसदेमध्ये मंजूर झालेल्या विविध विधेयकांमुळे सरकार आर्थिक सुधारणांना गती देण्याचा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला आहे. याच जोडीला आगामी पतधोरणामध्ये व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा बाजाराला आहे. यामुळे बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढत असला तरी आगामी सप्ताहात होणाऱ्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीमुळे सप्ताहाच्या उत्तरार्धात विक्री झाली. मात्र, सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले.मुंबई शेअर बाजार सतत दुसऱ्या सप्ताहात तेजीत दिसून आला. सप्ताहाच्या प्रारंभी बाजारात असलेला उत्साह उत्तरार्धात कमी झाला. नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे बाजार खाली आला असला तरी तो वाढीव पातळीवर बंद झाला. सप्ताहामध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २४,८२० ते २४,४५१ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो २४,७१७.९९ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ७१.५१ अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ०.३३ टक्का म्हणजेच २४.८५ अंशांनी वाढून ७,५१०.२० अंशांवर बंद झाला. पाच सप्ताहांनंतर हा निर्देशांक ७,५०० अंशांची पातळी गाठू शकला आहे.गतसप्ताहामध्ये संसदेने मंजूर केलेल्या विविध विधेयकांमुळे साकार आर्थिक सुधारणांना गती देऊ इच्छित असल्याचा संदेश गेला आणि बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली. सप्ताहाच्या उत्तरार्धात जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादनविषयक आकडेवारीने बाजाराची निराशा झाली. युरोपच्या सेंट्रल बँकेने गतसप्ताहात नवीन प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली आहे. मागील पॅकेज हे आकर्षक असल्याने युरोपमधील शेअर बाजार गतसप्ताहामध्ये तेजीत राहिले. पुढील सप्ताहात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक होणार आहे. या बैठकीकडे बाजाराचे डोळे लागले आहेत. परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहामध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. या संस्थांनी बाजारात ३,०२१ कोटी रुपये गुंतविले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये धातूंच्या भावात सुरू असलेली वाढ कायम आहे. याचा फायदा धातू कंपन्यांना मिळत असून, त्यांचे समभाग वाढत आहेत.