Join us

वर्षअखेरपर्यंत एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण करणार, स्वदेशी कंपनीलाच विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 02:12 IST

वर्षाअखेरपर्यंत एअर इंडियातील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे, तसेच स्वदेशी कंपनीलाच एअर इंडियाची विक्री केली जाणार आहे.

नवी दिल्ली : वर्षाअखेरपर्यंत एअर इंडियातील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे, तसेच स्वदेशी कंपनीलाच एअर इंडियाची विक्री केली जाणार आहे.सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, एअर इंडियातील निर्गुंतवणुकीस केंद्रीय मंत्रिमंडळाने जूनमध्येच तत्त्वत: मान्यता दिली आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिगट निर्गुंतवणुकीची योजना ठरवित आहे. एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया आम्ही वर्षअखेरपर्यंत पूर्ण करू. एअर इंडियाचे खासगीकरण करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही.एअर इंडियाची विक्री कोणाला करायची, याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. तथापि, आतापर्यंत तरी स्वदेशी कंपनीला प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. काही विदेशी कंपन्यांनी एअर इंडियाच्या खरेदीत रस दाखविला आहे. त्यात काही विमान वाहतूक कंपन्याही आहेत, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.एअर इंडियामधील सरकारची संपूर्ण हिस्सेदारी विकण्याची शिफारस केल्यानंतर, या संबंधीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. एअर इंडियाच्या कर्जाचे काय करायचे, यावर मंत्रिगट विचारविनिमय करीत आहे. कोणीही खरेदीदार एअर इंडियाचे कर्ज आपल्या डोक्यावर घेणार नाही, हे स्पष्टच आहे. हे कर्ज अंशत: निर्लेखित करण्याचा एक पर्याय चर्चिला जात आहे.2019 मधील लोकसभा निवडणुकीआधी निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पार पाडण्याचा सरकारचा मानस आहे. मंत्रिगटाला यासाठी अनेक बाबींचा निपटारा करावा लागणार आहे. त्यात एअर इंडियाचे कर्ज, मालमत्तेचा ठरावीक भाग एखाद्या सेल कंपनीला देणे, विलगीकरण (डी-मर्जर), एअर इंडियाच्या तीन नफ्यांतील कंपन्यांची निर्गुंतवणूक आणि निविदा प्रक्रिया यांचा त्यात समावेश आहे.