Join us  

नोकरदार वर्गाला मिळणार भरघोस पगारवाढ; कंपन्या लॉकडाऊनच्या फटक्यातून सावरल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 11:16 AM

तिसरी लाट न आल्यास किंवा परिस्थिती नियंत्रणात राहिल्यास पुढील आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना ८ टक्क्यांपर्यंत पगारवाढ मिळू शकते असा अंदाज मायकल पेज आणि एऑन पीएलसी यांनी वर्तवला आहे

ठळक मुद्देव्यवसाय वृद्धी दिसत असल्याने भरघोस पगारवाढ मिळू शकतेई कॉमर्स, औषधी, आयटी, वित्तीय सेवा या क्षेत्रांमध्ये भरघोस वेतनवाढ होण्याची शक्यता आहेपुढील २ वर्ष हे चित्र राहण्याचा अंदाज आहे. मात्र वाढत्या महागाईचा अडथळा निर्माण होऊ शकतो.

नवी दिल्ली – कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर अनेकांना पगार कपातीचा सामना करावा लागला. मात्र पुढील वर्षी नोकरदार वर्गाला मोठी पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणातून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र रुग्णसंख्येत घट आणि वाढत्या लसीकरणानंतर निर्बंध हटवण्यात येत आहेत.परिणामी कंपन्याही लॉकडाऊनच्या फटक्यातून सावरताना दिसत आहेत. व्यवसाय वृद्धी दिसत असल्याने भरघोस पगारवाढ मिळू शकते. ई कॉमर्स, औषधी, आयटी, वित्तीय सेवा या क्षेत्रांमध्ये भरघोस वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती सध्या व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र तिसरी लाट न आल्यास किंवा परिस्थिती नियंत्रणात राहिल्यास पुढील आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना ८ टक्क्यांपर्यंत पगारवाढ मिळू शकते असा अंदाज मायकल पेज आणि एऑन पीएलसी यांनी वर्तवला आहे. कोरोनाच्या फटक्यानंतर भारताचा आर्थिक विकासदर सर्वाधिक राहण्याचा अंदाज आहे. पुढील २ वर्ष हे चित्र राहण्याचा अंदाज आहे. मात्र वाढत्या महागाईचा अडथळा निर्माण होऊ शकतो. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सध्या महागल्या आहेत. मात्र उद्योगांचा गाडा रुळावर येत असल्याने आशादायी चित्र निर्माण झाले आहे. रोजगार वाढू लागले आहेत. त्यामुळे आर्थिक विकासात वाढ होऊ शकते.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या