इस्तंबूल : कंपनी विकून मालामाल झालेल्या तुर्कस्तानमधील एका उद्योगपतीने आपले ऐश्वर्य कर्मचारी व कामगारांच्या कष्टातून उभे राहिले आहे याची जाणीव ठेवत अचानक झालेल्या धनलाभातून प्रत्येक कामगारास दीड लाख पौंड (सुमारे दीड कोटी रुपये) बोनस देण्याचे जाहीर केले आहे. या दिलदार मालकाचे नाव नेवझत ऐदिन असे असून या औदार्यामुळे ‘जगातील सर्वोत्तम बॉस’ म्हणून त्यांची वाखाणणी होत आहे.ऐदिन हे ‘येमेकसेपेती’ या तुर्कस्तानमधील सर्वात मोठ्या आॅनलाईन फूड आॅर्डरिंग कंपनीचे संस्थापक आहेत. १५ वर्षांपूर्वी अवघ्या पाच हजार पौंडांची गुंतवणूक करून त्यांनी स्थापन केलेली ही कंपनी आता ‘डिलिव्हरी हीरो’ या जर्मनीमधील याच धंद्यातील दिग्गज कंपनीने तब्बल ३७५ दशलक्ष पौंडांना विकत घेतली (टेकओव्हर) केली आहे. अशा प्रकारे ऐदिन यांना या व्यवहारात जे घबाड मिळाले ते सर्वस्वी आपले आहे असे न मानता त्यांनी, ज्यांच्या कष्टातून कंपनीची भरभराट झाली त्या आपल्या ११४ कर्मचाऱ्यांना यातील १७ दशलक्ष पौंडाचा वाटा ‘बोनस’ म्हणून वाटण्याचे ठरविले आहे.कंपन्यांच्या ‘टेकओव्हर’च्या व्यवहारात विकल्या जाणाऱ्या कंपनीने त्यातून होणाऱ्या नफ्याचा वाटा कामगार-कर्मचाऱ्यांना देण्याची पाश्चात्य उद्योगविश्वातील ही काही पहिली घटना नाही. ८० दसलक्ष पौंड गुंतवून स्थापन केली गेलेली अमेरिकेतील ग्रॅण्ड रॅपिडस् अस्फाल्ट ही कंपनी १९९९ मध्ये १२८ दशलक्ष पौंडांना ‘टेकओव्हर’ केली गेली तेव्हा त्या कंपनीचे संस्थापक बॉब थॉम्पसन यांनीही आपल्या ५५० कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारे बोनस दिला होता. तरीही ऐदिन यांचे औदार्य बोनस संस्कृती जोपासणाऱ्या वॉल स्ट्रीटलाही मागे टाकणारे आहे.
दिलदार मालकाने केले कामगारांना मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 22:57 IST