Join us

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ५ ते ७% महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 06:16 IST

दरवाढीचा अंदाज : नुकसान भरून काढणार

मुंबई : येत्या महिनाभरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ५ ते ७ टक्के महागण्याचा अंदाज आहे. नवरात्र व दिवाळीदरम्यान विविध आॅफर्सअंतर्गत कंपन्यांनी किमतीतील वाढ रोखली होती. पण आता उत्सवी काळ संपल्याने या वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपन्या सुटे भाग विदेशातून आयात करतात. जुलै ते सप्टेंबरदरम्यान रुपया डॉलरसमोर कमकुवत झाल्याने ही आयात महागली होती. त्यातून या उपकरणांचा उत्पादन खर्च वाढला होता. पण उत्सवाचा काळ असल्याने कंपन्यांनी आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात किमतीतील वाढ रोखून धरली होती. आता मात्र डिसेंबरमध्ये कंपन्या या वस्तू महाग करतील, असे स्पष्ट संकेत आहेत.

कन्झुमर इलेक्ट्रानिक्स अ‍ॅण्ड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननुसार (सीआमा), आयात खूप महाग झाल्याने कंपन्यांनी सप्टेंबर महिन्यात वस्तू ३ ते ४ टक्के महाग केल्या होत्या. पण आॅक्टोबरमधील नवरात्र व नोव्हेंबरमधील दिवाळी, या दरम्यान विविध आॅफर्समुळे किमतीतील या वाढीचा परिणाम दिसला नाही. पण आता मात्र आॅफर्सचा कालावधी निघून गेला आहे. त्यामुळे कंपन्या पुन्हा किमती वाढविण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रॉनिक्स उपकरण क्षेत्रातील पॅनासोनिक इंडिया या कंपनीने वस्तूंच्या किमती ७ टक्के वाढविण्याची अधिकृत घोषणाकेली आहे. तर हेयर इंडिया, गोदरेज अप्लायन्सेस यांनीसुद्धा आॅफर्स कालावधितील नुकसान भरुन काढण्यासाठी वस्तूंच्या किमती किमान ५ टक्के वाढतील, असे स्पष्ट केले आहे.सवलतीनंतरही विक्रीत वाढ नाहीया क्षेत्रातील डीलर्सनुसार, वास्तवात आॅफर कालावधीत आॅनलाइन कंपन्यांनी भरमसाठ सवलत दिली होती. अनेक कंपन्यांचा आॅनलाइन पोर्टलशी थेट करार होता. त्याअंतर्गत त्यांना सवलतीच्या दरात वस्तू पोर्टलमार्फत ग्राहकांना विक्री कराव्या लागल्या होत्या. अशा भरमसाठ सवलती व आॅफर्स दिल्यानंतरही उपकरणांच्या विक्रीत फार वाढ झाली नाही. टीव्ही आणि एअर कन्डिशन्ड या सर्वाधिक खपाच्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची विक्री घटली. रेफ्रीजरेटरच्या विक्री मागील दिवाळीपेक्षा काहीच वाढ झाली नाही. वॉशिंग मशीनची विक्री किंचीत वाढली. केवळ मोबाइल हॅण्डसेटच्या विक्रीत थोडी वाढ झाली. यामुळेच एकूणच सवलत दिल्यानंतरही कंपन्यांना फार फायदा झाला नाही. पण यादरम्यान जी माफक विक्री झाली, त्यामुळे कंपन्यांचे नुकसना झाले. ते आता कंपन्या डिसेंबरमध्ये भरुन काढणार आहेत.ं