Join us

विदर्भ, मराठवाड्यात औद्यगिक वीज स्वस्त होणार

By admin | Updated: May 13, 2016 04:36 IST

विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना युनिटमागे सव्वा रुपया ते पावणेदोन रुपये इतकी वीज स्वस्त करण्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या मंगळवारच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना युनिटमागे सव्वा रुपया ते पावणेदोन रुपये इतकी वीज स्वस्त करण्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या मंगळवारच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज या बाबतची माहिती दिली. महानिर्मिती, महावितरण व महापारेषण या तीनही कंपन्यांमार्फत राज्यात सुरु असलेल्या व भविष्यात करण्यात येणाऱ्या विकास कामांचा पाठपुरावा करण्यासाठी तीनही कंपन्यांचा प्रत्येकी एक सेल तयार करण्यात येणार आहे. या कंपन्यांच्या विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्याचा या आधीचा प्रस्ताव आता बारगळला आहे. तिन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक ऊर्जा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.तिन्ही कंपन्यांमध्ये समन्वय आणि कामांची अंमलबजावणी यासाठी हे सेल कार्यरत असतील. बावनकुळे यांनी सांगितले की, मराठवाडा व विदर्भातील वीजदर कमी करणे, तसेच कापूस उत्पादक प्रदेश असल्याने यंत्रमाग व्यावसायिकांना लावण्यात येणारा वीजदर कापूस प्रक्रि या उद्योगांना लावण्यात यावा या संदर्भातील प्रस्ताव मंत्रीमंडळसमोर येत्या मंगळवारी येईल. हे वीज दर कमी करण्यासंदर्भात नेमलेल्या अनुपकुमार समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला आहे. फ्लाय अ‍ॅश संदर्भातील धोरणही लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येणार आहे. सूत्रांनी सांगितले की, युनिटमागे सव्वा रुपया ते पावणेदोन रुपये वीज स्वस्त करण्याचा प्रस्ताव आहे. प्रत्येक तालुक्यात महावितरणचे ट्रान्सफॉर्मर भवन तयार करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यानुसार पाहिल्या टप्प्यात प्रायोगिक स्तरावर ५० ट्रान्सफॉर्मर भवन तयार करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)