मुंबई : निवडणूक निकालानंतर शेअर बाजारात सलग चार सत्रांत तेजी सुरूच होती. ही तेजी बुधवारी अखेरीस थांबली. जागतिक कमजोर संकेतामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७८ अंकांनी कोसळून उच्चांकावरून खाली आला. मागील चार सत्रांत ५६२ अंक वाढलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७८.८६ अंकांनी किंवा ०.३२ टक्क्याने घसरला. घसरणीसह सेन्सेक्स २४,२९८ अंकावर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी २२.६० अंकांनी खाली येऊन ७,२५२.९० अंकावर बंद झाला. सत्रादरम्यान निफ्टी ७,२०६ पर्यंत कोसळला होता. कॅपिटल गुडस्, बँकिंग, तेल आणि गॅस, आरोग्स सेवा कंपन्यांचे शेअर्स घसरले. सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या बाजूने स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर १६ मे रोजी सेन्सेक्स व निफ्टीने वाढीचा उच्चांक गाठला होता. ब्रोकर्सने सांगितले की, नुकत्याच आलेल्या तेजीमुळे बाजारात खरेदी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सुमारे एक महिन्यापर्यंत खरेदीचे पाठबळ मिळाल्यानंतर परकीय संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा सुरू झाला. त्यामुळे सेन्सेक्स खाली आला. (प्रतिनिधी) शेअर बाजारातील अस्थायी आकडेवारीनुसार परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी १०४.५३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. माहिती तंत्रज्ञान, रियल्टी, वाहन, एफएमसीजी व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्सची वाढ मर्यादित राहिली. याउलट स्मॉल व मिडकॅप शेअर्सने चांगले प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)
शेअर बाजारातील निवडणूक ‘इफेक्ट’ ओसरला
By admin | Updated: May 22, 2014 02:19 IST